Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गंगाखेडमध्ये खताचा खुलेआम काळाबाजार!
गंगाखेड, २४ एप्रिल/वार्ताहर

 

तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतासाठी अत्यावश्यक असलेल्या रासायनिक खतांची कृषी बाजारपेठेत धनदांडग्या व्यापाऱ्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत आहे. परिणामी शासन मूल्यापेक्षा कित्येकपटीने वाढीव भावात खत विक्री सुरू असल्याचे दिसत आहे.
भारिप- बहुजन महासंघाचे मराठवाडा सचिव तथा पंचायत समिती सदस्य यशवंत भालेराव यांनी आज शुक्रवारी सकाळी शहरातील जयकिसान ट्रेम्डर्सच्या मालकास चढय़ा भावाने खतविक्री केल्याप्रकरणी शेतकऱ्यांसमक्ष धारेवर धरल्याचीही घटना घडली.
गतवर्षी शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी झालेली व्यापाऱ्यांकडूनची पिळवणूक लक्षात घेता यावर्षी शेतकऱ्यांनी जागरुकपणे लवकरच खत खरेदीचा निर्णय घेतला आहे. मात्र व्यापाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणाचा फटका प्रारंभापासूनच शेतकऱ्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. डीएपी, २६२६१०, युरिया आदी खतांसाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. शासन मूल्यापेक्षा कित्येक पटीने जादा दराने पैशांची आकारणी करण्याचे धोरण व्यापाऱ्यांनी राबविले आहे.
व्यापाऱ्यांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खरेदी पावती, साठा नोंदणी रजिस्टर, साठा फलक मात्र दाखविण्यास नापसंती दर्शविली. यावरूनच व्यापाऱ्यांच्या चालाख बुद्धीचे प्रदर्शन पुढे येत आहे. राजकीय दबावाचा वापर करीत व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करताना आढळत आहे. शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून भारिपचे पंचायत समिती सदस्य यशवंत भालेराव यांनी जय किसान ट्रेडर्सचे मालक जुगलकिशोर राठी यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र राजकीय दबावतंत्राचा वापर करू पाहणाऱ्या श्री. राठी यांना शेतकऱ्यांच्या तीव्र असंतोषासमोर झुकावे लागले.