Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
परभणी, २४ एप्रिल/वार्ताहर

 

अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शहरातील नूतन विद्यामंदिर सभागृहात कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणात खरीपपूर्व हंगामाबाबतीत शेतकऱ्यांना द्यावयाच्या माहितीसंदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कृषी विद्यापीठातील विविध विभागांच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जी. टी. सुगावे, डॉ. एस. आर. ओझा,डॉ. एस. डी. जेटुरे, डॉ. डी. जी. डावरे, डॉ. अनिल गोरे होते.
प्रास्ताविकात उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस. पाटील यांनी खरीप हंगामातील पिकांच्या नियोजनाबाबतीत ऊहापोह केला. या वेळी डॉ. सुगावे यांनी कडधान्याच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, कडधान्य पिकांची पेरणी करण्याअगोदर वीज प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वीज प्रक्रियेमुळे १५ ते २० टक्के उत्पन्नात वाढ होते, वेळेवर पेरणी, सुधारित जातीची शिफारस, अंतर मशागत, खते, कीड व रोग इत्यादींचे व्यवस्थित नियोजन केले तर उत्पादन वाढण्यास मदत होते.
डॉ. अनिल गोरे यांनी खरीप हंगामातील पिकांमधील तनाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले, तर डॉ. जेटुरे यांनी रोहयोअंतर्गत फळबाग लागवडीबाबत माहिती सांगितली. डॉ. एस. आर. ओझा यांनी जमिनी सुधारणा आणि जलव्यवस्थापन कसे करावे याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच डॉ. डी. जी. डावरे यांनी सोयाबीन, कापूस, ज्वारी या पिकांवरील कीड व रोग यांचे व्यवस्थापनाबरोबरच कापूस पिकावरील लाल्या रोगासंदर्भात मार्गदर्शन केले व शेवटी अध्यक्षीय समारोपात साहेबराव दिवेकर म्हणाले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान खरीप पूर्व हंगामातील पिकांचे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर करावा यासाठी १ मे ते ३१ मेपर्यंत कृषी दिंडीचे आयोजन केले आहे.
या दिंडींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विभागातील कर्मचारी माती परीक्षण, बीज प्रक्रिया, पिकावरील रोग, कीड नियंत्रम खत, पाणी, इत्यादीचे तांत्रिक व शास्त्रोक्त पद्धतीने गावा-गावांत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रात्यक्षिकांसह माहिती देणार आहेत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या माहितीपत्रक व शेतकरी मासिकाचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन साहेबराव दिवेकर यांनी केले. सूत्रसंचालन गिरी यांनी केले. आभार तालुका कृषी अधिकारी देशमुख यांनी मानले.