Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शिवशक्ती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवाजीराव चालुक्य
उमरगा, २४ एप्रिल/वार्ताहर

 

कोळसूर येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवाजीराव चालुक्य यांची व उपाध्यक्षपदी रमेश माने यांची आज बिनविरोध निवड झाली.
शिवशक्ती कारखान्याची पहिली पंचवार्षिक निवडणूक २९ मार्चला घेण्यात आली होती. या निवडणुकीत शिवाजीराव चालुक्य यांच्या शिवशक्ती शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १६ जागांवर विजय मिळविला. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष बाबा पाटील यांच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचा धुव्वा उडवला होता. शुक्रवारी कारखानास्थळावर या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डी. एल. पोरडवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली.
अध्यक्षपदासाठी शिवाजीराव चालुक्य यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कारखान्याचे संचालक मोहन माने यांनी श्री. चालुक्य यांचे नाव सुचविले, त्यास शिवाजीराव गायकवाड यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी रमेश माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. संचालक पंडित शिंदे यांनी श्री. माने यांचे नाव सुचविले. त्यास मंदाकिनी गायकवाड यांनी अनुमोदन दिले. श्री. चालुक्य व श्री. माने यांचे दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पोरडवार यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
त्या दोघांचा सत्कार श्री. पोरडवार यांनी केला. या वेळी अभय चालुक्य, शरद माने, रणजितसिंह उडान, नगरसेवक हंसराज गायकवाड, हर्षवर्धन चालुक्य, अशोक पाटील, वामन गायकवाड उपस्थित होते.