Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सुनेचा खून करणाऱ्या सासऱ्यास जन्मेठेपेची शिक्षा
नांदेड, २४ एप्रिल/वार्ताहर

 

अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या विधवा सुनेचा निर्घृण खून करणाऱ्या सोविंदराव लाला चव्हाण (वय ६०) याला वृद्धास न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एम. सरदेशपांडे यांनी या खटल्याचा निकाल देताना आरोपीला एक हजार रुपये दंडही केला.
किनवट तालुक्यातल्या लिंगी तांडा येथील मुरलीधर चव्हाण याचे १९९७मध्ये सुलोचनाशी लग्न झाले होते. लग्नानंतर ५-६ वर्षांनी मुरलीधरचा मृत्यू झाला. सुलोचना मुलगा आकाशसमवेत सासुरवाडीतच राहू लागली. अंगणवाडी सेविकेचे काम करून ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होती. सुलोचनाचा सासरा सोविंदराव चव्हाणने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. त्याची ही मागणी तिने स्पष्ट शब्दात फेटाळल्यामुळे संतापलेल्या सासऱ्याने २२ ऑगस्ट २००७ रोजी दळण दळणाऱ्या सुलोचनावर कुऱ्हाडीचे वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. सुलोचनाने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे रहिवासी तेथे जमले.
गावकरी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोविंदरावने तेथून पळ काढला. गावकऱ्यांनी सुलोचनाला मांडवीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला नागपूर येथे हलविण्यात आले. चौदा दिवसांनंतर तिचे निधन झाले. मांडवीचे तेव्हाचे पोलीस उपनिरीक्षक जे. जी. पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. एकूण १० साक्षीगारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद व उपलब्ध पुरावे ग्राह्य़ मानत न्या. बी. एम. सरदेशपांडे यांनी आज चव्हाणला जन्मठेप व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली. सरकार पक्षाची बाजू व्ही. एम. पवार-निवधेकर यांनी मांडली.