Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

परभणीकरांना फसवणारे ‘बंटी-बबली ’ जेरबंद
परभणी, २४ एप्रिल/वार्ताहर

 

रिलायन्स कंपनीत सेल्स मॅनेजर असल्याची बतावणी करीत परभणीकरांना एक लाख रुपयांना गंडा घालून फरारझालेल्या चंदन चौकशी व त्याची पत्नी कल्पना हिला पाच महिन्यांनंतर नानलपेठ पोलिसांनी अटक केली. या दोघांची परभणीत बंटी व बबली अशी ओळख होती.
चंदन ओमप्रकाश चौकशी (वय २५) व कल्पना चंदन (वय २२) हे दोघे रामटेक तालुक्यातील मनखर येथील रहिवासी आहेत. २००८ मध्ये या दोघांनी कल्याणनगर येथे भाडय़ाने खोली घेऊन वास्तव्य केले. टापटीप राहणीमान व संभाषण चातुर्य त्यांच्याकडे असल्याने या जोडीची बंटी व बबली म्हणूनच परभणीत ओळख होती.
नोव्हेंबर २००८ मध्ये या दोघांनी प्रसाद गुलाबचंद सोनी यांच्याकडून आपण रिलायन्स कंपनीचे सेल्स मॅनेजर असून तुमच्या इमारतीवर रिलायन्स कंपनीचा मनोरा उभा करावयाचा आहे, अशी भूलथाप देऊन त्यांच्याकडून नगदी ४० हजार रुपये व १२ हजार ८०० रुपयांचे फर्निचर घेतले. प्रसाद सोनी यांचे कच्छी बाजार येथील सोनी एजन्सी हे फर्निचरचे दुकान आहे.
कल्याणनगरमध्ये राहणाऱ्या हरिशकुमार अग्रवाल यांच्याकडूनही मनोरा उभारणीसाठी म्हणून २० हजार रुपये रोख घेतले व त्यांची मोटारसायकल घेऊन फरार झाले. त्यापूर्वी सनी कॉम्प्युटर येथून खोटे कागदपत्र तयार करून ३५ हजार रुपये किमतीचे एक संगणक संच घेऊन त्यांनी त्यांची फसवणूक केली होती. प्रसाद सोनी, हरिश अग्रवाल व सनी कॉम्प्युटरच्या संचालकांना फसवून चंदन व कल्पना हे ‘बंटी-बबली’ जोडपे परभणीतून फरार झाले.प्रसाद सोनी यांच्या फिर्यादीवरून १८ नोव्हेंबर २००८ ला नानलपेठ पोलिसांनी चंदन व कल्पना यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या दोन भामटय़ांच्या मूळ गावी मनसर, रामटेक, नागपूर, जवळकर येथे शोध घेतला; परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. बंटी व बबली औरंगाबादच्या मुकुंदवाडीमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्री नानलपेठ पोलिासंनी सापला रचून त्या दोघांना ताब्यात घेतले. आज सकाळी त्यांना परभणीत आणले. त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली. बंटी व बबली यांचा शोध घेण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अशोक पवार, लोखंडे, टेकूळे, कच्छवे, अहमद, बाबरी यांनी बजावली.