Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अचानक ठेवलेल्या पिंडीमुळे खळबळ
अंबाजोगाई, २४ एप्रिल/वार्ताहर

 

रेणुकादेवी देवस्थान परिसरात असलेल्या नियोजित दत्त मंदिर बांधकामाच्या चबुतऱ्यावर गुरुवारी अज्ञात व्यक्तींनी अंदाजे सात क्विंटल वजन असलेली दगडी महादेवाची पिंड आणून ठेवल्याने भक्तजणांत खळबळ उडाली आहे. ही पिंड कोणी व कोणत्या उद्देशाने आणून ठेवली या विषयी चर्चेला उधाण आले आहे.
अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस असलेल्या श्रीक्षेत्र रेणुकादेवी या जागृत देवस्थान परिसरात दत्त मंदिराचे बांधकाम करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून एक चबुतरा बांधण्यात आला आहे. यावर गुरुवार (२३ एप्रिल) पर्यंत कोणत्याही प्रकारची मूर्ती नव्हती. मात्र गुरुवारी अचानक काही अज्ञात व्यक्तींनी अंदाजे पाच फूट लांब व तीन फूट रुंद, अडीच फूट उंच व सात क्विंटल वजन असलेली महादेवाची पिंड आणून ठेवली. या पिंडीचे दैनंदिनरित्या पूजन होत असल्याचे प्राप्त दर्शनीवरून स्पष्ट दिसून येत असून ही पिंड अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या साह्य़ाने आणून ठेवल्याच्या खुणा दिसून येत आहेत.
या प्रकाराने अंबाजोगाई शहरातील भक्तगणात खळबळ उडाली असून ही ही भव्य पिंड कोणत्या व्यक्तींनी कोणत्या ठिकाणाहून व कोणत्या उद्देशाने आणून ठेवली. या विषयी विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे. अचानकपणे ही पिंड या ठिकाणी आल्यामुळे तिला पाहण्यासाठी भविकांची गर्दी होत आहे. श्रीरेणुका मंदिर परिसरात आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी, संतकवी दासोपंत आणि नव्यानेच बांधण्यात आलेल्या महामृत्यूंजय जप मंदिरामुळे या परिसराचे वेगळे महत्त्व आहे. अशा परिस्थितीत महादेवाची पिंड आणून ठेवल्यामुळे ही पिंड कोणी आणून ठेवली यामुळे तर्कवितर्क लढविल्या जात आहेत.