Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गंगाखेड तालुक्यात सात पाझर तलाव कोरडे!
गंगाखेड, २४ एप्रिल/वार्ताहर

 

गंगाखेड तालुक्यातील सात पाझर तलाव अक्षरश: कोरडे पडल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महेश फड तसेच समाजकल्याण सभापती शिवाजी निरदुडे प्रतिनिधित्व करीत असलेल्या जिल्हा परिषद गटांत अशी परिस्थिती आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिक संघर्षांच्या पवित्र्यात असल्याचे कळते.
तालुक्यात वडवणी, उंडेगाव, कातकर वाडी, अंतरवेली, ढेबेवाडी, खादगाव, तांदूळवाडी व डोंगरगाव येथे पाझर तलाव आहेत. मात्र तपमानाने उच्चांक गाठल्यामुळे तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गंभीर दुर्लक्षामुळे वरील सर्व पाझर तलाव कोरडे पडले आहेत. अनेक पाझर तलावांची कामे दर्जेदार न झाल्याने कोटय़वधी रुपये अक्षरश: वाया गेले आहेत. उंडेगाव पाझर तलावाजवळच्या विहिरीचे पाणी पावसाळ्यातच निघून जाते. या विहिरीचे काम दर्जाहीन झाले आहे.
कातकरवाडी पाझर तलावाचे काम तर गेल्या १५ वर्षांपासून अर्धवट आहे. वडवणी व खारगाव तलावाच्या भिंतीचे काम ठेकेदाराकडून व्यवस्थित न झाल्याचे कळते.
डोंगरगाव पाझर तलावावर तर आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्ची झाले आहेत. मात्र पावसाळ्यात पाणीच साठवले जात नाही. ढेबेवाडी येथेही हाच प्रकार घडला आहे. तालुक्यातील पाझर तलाव ठेकेदारांना पोट भरण्यासाठी बांधले आहेत की काय, असा संतप्त सवाल नागरिकांतून उमटत आहे.
तालुक्यातील सातही पाझर तलावांच्या दुरुस्तीचे काम नव्याने हाती घेण्याची गरज निर्माण झाली असून पूर्वीच्या ठेकेदारांकडूनच हे काम करून घेण्याचे तसेच त्यांना दुरुस्तीचे बिले अदा न करण्याचे धाडस जिल्हा प्रशासनासह लघुसिंचन विभाग दाखवील का, असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. ही दुरुस्तीचे कामे नव्याने झाल्यास तालुक्यात शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन पाणीप्रश्न कायमचा मिटण्यासाठी मदत होईल.
आयुक्त मुंडेंचे गावही तहानलेले
औरंगाबाद महसूल विभागाचे विभागीय आयुक्त भास्कर मुंडे हे गंगाखेड तालुक्याचे! त्यांच्या नद्या जोड महाकार्यक्रमाची महती राज्यासह देशभरात यशस्वी ठरली असताना त्यांच्या मूळ गावात म्हणजे तालुक्यातील अंतरवेली येथीलच पाझर तलाव स्थानिक अधिकारी व ठेकेदारांच्या गैरकारभारामुळे कोरडा पडला आहे. गेल्या महिन्यातच श्री. मुंडे यांनी या गावास जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव आदीसह भेट दिली होती. जिल्हा प्रशासनाच्या डझनभर अधिकाऱ्यांना गावकऱ्यांसमक्ष माझे गाव तुम्ही स्वत:चे गाव समजून गावाच्या प्रश्नाकडे तळमळीने लक्ष द्या, असे सांगितले होते.