Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कडब्याचे दर गगनाला, चारा डेपोंची मागणी
लोहा, २४ एप्रिल/वार्ताहर

 

निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत जनावरांच्या चारा-पाण्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. सोयाबीनसारख्या नगदी पिकामुळे ज्वारीच्या लागवडीत घट झाल्यामुळे कडबा पेंडी दहा-बारा रुपयाला एक या प्रमाणे पशुपालकांना विकत घ्यावी लागत आहे. कडब्याचे दर प्रचंड वाढल्यामुळे जनावरांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
दहा वर्षांपूर्वी शेकडा नव्वद-शंभर रुपयांप्रमाणे कडबा सहज मिळायचा. पेरणीच्या तोंडावर शेतकरी शे-दोनशे पेंडय़ा कडबा विकत घेत असे. सालभर शेतात लावलेली कडब्याची गंजी असायची, पण नगदी पिकाच्या पद्धतीमुळे ज्वारीखालील क्षेत्र झपाटय़ाने घटले. सोयाबीन, कापूस, कडधान्य, लागवडीकडे वळलेल्या शेतकऱ्यांना कडबा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेतातील विहिरीला पाणी असायचे त्यावर कडोळ टाकून चाऱ्याची सोय केली जायची पण यंदा पाऊस कमी झाला. विहिर, बोअर आटल्यामुळे शेतात ओलिताचे क्षेत्र कमी झाले.
जनावरांसाठी चारा-पाणी समस्या निर्माण झाली. हजार बाराशे रुपये शेकडा अशा विक्रमी भावाने ज्वारीचा कडबा विकला जात आहे. त्यासाठी गावोगावी फिरण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. एकेकाळी साठ रुपये शंभर याप्रमाणे कडबा कोणी विकत घेत नसे. आज याच कडब्याचे दर गगनाला भिडले आहेत. नियोजनाचा अभाव असलेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीचे क्षेत्र घटविले; त्यामुळे चारा टंचाई उद्भवली. गंगथडी चाऱ्याचा प्रश्न गंभीर नसतो; परंतु यंदा कालव्याद्वारे पाणी सोडले नसल्यामुळे त्या भागातही चारा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम पशुधनाची विक्री होत आहे. शासनाने तात्काळ चारा डेपो व पाण्याची सोय करावी. चाऱ्याच्या छावण्या उभाराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.