Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वाढत्या उन्हामुळे फळांच्या रसाच्या मागणीत प्रचंड वाढ
लातूर, २४ एप्रिल/वार्ताहर

 

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेले नागरिक उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी फळांच्या रसावर भर देऊ लागली आहेत. परिणामी सध्या ‘ज्यूस सेंटर’ व उपाहारगृहांमध्ये रसाच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
‘ज्यूस सेंटर’मध्ये अंजीर, मँगो, खरबूज, कलिंगड, अननस, डाळिंब, गुलाब, संत्रा, सफरचंद, मोसंबी, गाजर, सीताफळ, रामफळ आदी फळांचे रस मिळतात. ‘मिक्स ज्यूस’मध्ये सफरचंद, चिकू, अननस, मिल्कशेक, चॉकलेट यांना अधिक मागणी आहे.
यात दूध, साखर, फळे व बर्फ यांचे मिश्रण असते. ‘मिक्स ज्यूस’ला अधिक मागणी आहे. त्यातही बर्फ न घातलेल्या रसाची मागणी मोठी आहे.
वाढत्या उन्हामुळे दिवसा घराबाहेर पडणे टाळले जात असून सायंकाळी ४ वाजल्यानंतर नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे ४ वाजल्यानंतरच ज्यूससेंटर व हॉटेलमध्ये गर्दी दिसून येत आहे. शहरातील खर्डेकर स्टॉप येथील ‘फेमस ज्यूस बार’चे दुकानमालक बागवान बिलाल नूरपाशा यांनी सांगितले की, आमच्याकडे तब्बल १५ प्रकारचे रस उपलब्ध आहेत. मिक्स ज्यूसची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
ग्लासाला १० रुपये अशी फळांच्या रसाची किंमत आहे. हा दर सर्वसामान्य ग्राहकांनाही परवडणारा असल्यामुळे त्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
अंजीर, आंबा, कलिंगड, खरबूज, अननस, डाळिंब, संत्रा, आदी फळे लातूर येथील ‘मांजरा फ्रूट’ तसेच हैदराबाद येथून मिळतात. फळांचा रस आरोग्यासाठी अधिक उपयुक्त असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात पाणीदार फळे खाणे गरजेचे असते. त्यामुळे शरीरातील पाणी भरून निघण्यास मदत होते.
ज्यांना फळ घेणे परवडत नाही, त्यांनी ज्यूस सेंटर व हॉटेलचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे. कलिंगडाच्या फोडींची बशी पाच रुपयांत मिळत असल्याने त्यालाही ग्राहकांतून प्रचंड मागणी आहे, अशी माहिती गांधी चौक येथील निझाम फ्रूटचे मालक शेख पाशा यांनी दिली.
शहरात ‘मँगो ज्यूस सेंटर’ने ६ दुकाने थाटली आहेत. एका ज्यूस सेंटरमधून दिवसागणिक ३०० किलोच्या वर आंबे लागतात. सुभाष चौक, मुख्य बस स्थानकानजीक येथे मँगो ज्यूस सेंटरची दुकाने थाटली आहेत. टोकन पद्धतीने ग्राहकांना अवघ्या दोन मिनिटांत मँगो ज्यूस उपलब्ध करून दिला जातो आहे. पाच रुपये किमतीमुळे त्याला भरपूर मागणी आहे.