Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महिलेस विवस्त्र करून भरचौकात मारहाण?
लातूर, २४ एप्रिल/वार्ताहर

 

शहरात नांदेड रस्त्यावरील विवेकानंद चौकात दुपारी एकच्या सुमारास एका महिलेस विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरूआहे. मात्र याप्रकरणी नेमकी माहिती उपलब्ध झाली नसल्यामुळे कोणाच्याही विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला नाही.
शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान विवेकानंद चौकातील पोलीस चौकीसमोर एका महिलेस एक व्यक्ती मारहाण करीत होता. ती महिला मारहाणीने बेजार झाली होती. तिचे कपडे काढून तिला मारहाण होत असल्याचे दूरध्वनी गांधी चौक पोलिसांना व काही पत्रकारांना आले. घटनास्थळी पोलीस व पत्रकार पोहोचले तेव्हा घटनास्थळी सामसूम होती. या प्रकारामुळे काही काळ ट्रॅफिक जाम झाली होती. संबंधित महिला ही चोरीचे किरकोळ प्रकार करते व कोणी पकडायला आल्यास स्वत: अंगावरील कपडे काढते, असा दावा पोलिसांनी केला व त्यातीलच हा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांचा होता. मात्र जमावातील काहीजणांच्या म्हणण्यानुसार ती महिला वेडसर नसावी. तिचे कपडे काढल्यानंतर जमावातील काहींनी तिला कपडे दिले व त्यानंतर ती चौकातून निघून गेली. लेखी तक्रार प्राप्त न झाल्यामुळे व ठोस बाजू समोर येत नसल्यामुळे तक्रार दाखल केली नसल्याचे गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केशव लटपटे यांनी सांगितले.