Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आता आकडेमोड रंगू लागली
बीड, २४ एप्रिल/वार्ताहर

 

महिनाभर चाललेल्या राजकीय रणधुमाळीनंतर अखेर गुरुवारी किरकोळ दोन घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने जिल्हा प्रशासन, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व जनतेने सुटकेचा श्वास सोडला. मतमोजणी १६ मे रोजी असल्यामुळे कोण निवडून येणार, याची आकडेमोड आता रंगू लागली आहे.
बीड जिल्हा राजकीयदृष्टय़ा राज्यात सर्वाधिक संवेदनशील मानला जातो. त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीत राजकीय संघर्ष पेटले जातात. या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणूक शांततेत पार पडेल का, याबाबत प्रशासनासह सर्वाच्याच मनामध्ये धास्ती होती. भा. ज. प.चे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे लोकसभेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत असल्याने राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात जातीयवाद उफाळून आला. त्यामुळे मतदानाच्या दिवशी गावागावांत संघर्ष होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने सर्व राजकीय पाश्र्वभूमी लक्षात घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता, तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही उमेदवार असल्याने सुरुवातीपासूनच कोणावरही टीका न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून प्रचारासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंडे यांना लक्ष करताना अनेक ठिकाणी एकेरी भाषेचा उल्लेख केला. मात्र मुंडे यांनी प्रतिउत्तरही दिले नाही व कार्यकर्त्यांना कायम शांत राहण्याच्या सूचना दिल्या. राज्याचे लक्ष लागून असलेली या निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले.