Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सेनगाव येथे पाच घरांना आग
हिंगोली, २४ एप्रिल/वार्ताहर

 

सेनगाव येथील पोलीस ठाण्याजवळील वस्तीत आग लागून पाच घरातील कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने महसूल विभागातर्फे त्या पाच कुटुंबप्रमुखांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची तातडीची मदत वाटण्यात आली आहे.
२४ एप्रिलच्या सकाळी दहाच्या सुमारास पोलीस ठाण्याजवळ असलेल्या वस्तीतील शांताबाई धोतरे, अनिल धोतरे, दिलीप धोतरे, नामदेव वाकळे, सीताराम धोतरे, नामदेव वाकळे, सीताराम धोतरे या पाच कुटुंबीयांच्या घरास अचानक आग लागून घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
आगीचे कारण मात्र समजले नाही. परंतु घरातील चुलीमधून ठिणगी उडाल्याने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हिंगोली नगरपालिकेच्या अग्निशमन दल तातडीने पोहोचल्यामुळे आग विझविण्यात मदत झाली. मंडळ अधिकारी परसवाळे, तलाठी के. एम. शिंदे यांनी घटनास्थळास भेट देऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा करून आगीत नुकसान झालेल्या पाच कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे २५ हजार रुपये तातडीने मदत करण्यात आली.