Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वाहनचालकाला पन्नास हजारांस लुटले
नांदेड, २४ एप्रिल/वार्ताहर

 

खासगी काम आटोपून घरी परतणाऱ्या एका मोटरसायकलस्वारास अडवून बेदम मारहाण करीत त्याच्याजवळील पन्नास हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध हिमायतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काल सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, हदगाव येथील चंद्रकांत कल्याणकर हे त्यांचा भाचा बालाजी बंडे यांच्यासमवेत काल हिमायतनगरकडून वडगावकडे जात होते. अज्ञात चोरटय़ांनी वडगावजवळ मोटरसायकल अडवून मारहाण करून या दोघांचे हातपाय बांधून त्यांना शेतात टाकले. त्यांच्याजवळील मोटरसायकल, रोख रक्कम, मोबाईल, घडय़ाळ असा पन्नास हजार रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले.
तब्बल दोन तासांनंतर स्वत:ची कशीबशी सुटका करून घेऊन चंद्रकांत कल्याणकर यांनी हिमायतनगर पोलीस ठाणे गाठले तेथे रीतसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नांदेड जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या रस्त्यावर वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटनांत सातत्याने वाढ होत असतानाही पोलीस प्रशासन मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना करण्याच्या मनस्थितीत नाही.