Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

जेट एअरवेजमध्ये पगारकपात
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

 

जागतिक मंदीचा तडाखा आणि आर्थिक तोटय़ामुळे देशातील सर्वात मोठी खासगी हवाई वाहतूक कंपनी जेट एअरवेजने गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ७५ हजारांहून अधिक पगार घेणाऱ्या जेटच्या कर्मचाऱ्यांचे पगार पुढील महिन्यापासून पाच ते २५ टक्क्यांची कमी करण्यात येणार आहेत. मोठा आर्थिक फटका सोसावा लागत असल्याने जेट व्यवस्थापनाला हा पगार कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यानुसार कंपनीच्या व्यवस्थानातील उच्चपदस्थांच्या पगारात २५ टक्क्यांची कपात केली जाणार आहे. याखेरीज पाच लाखांहून अधिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना २० टक्के, दोन ते पाच लाख रुपये पगार घेणाऱ्यांना १० टक्के आणि ७५ हजार ते दोन लाख रुपये पगार घेणाऱ्यांना पाच टक्के पगार कपातीला समोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये विविध भत्त्यांखेरीज कारची सुविधा आणि कार दुरुस्ती भत्ता कमी केला जाणार आहे. ही पगारकपात पुढील महिन्यानंतर लागू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जेटच्या प्रवक्त्यानेही या पगारकपातीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र ही पगार कपात हंगामी स्वरुपाची आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.