Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

अंबानींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधनटाकीत दगड; चारजण ताब्यात
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

 

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमधील इंधन टाकीमध्ये दगड आढळून आल्याप्रकरणी सहार पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. इंधन टाकीतील दगडांमुळे हेलिकॉप्टरचा स्फोट होण्याची शक्यता होती. त्यामुळे या प्रकारामागे घातपात घडविण्याचा कट होता का यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. या प्रकाराचे लक्षात घेऊन या प्रकरणाच्या तपासाची सुत्रे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती आज सहआयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवस हे हेलिकॉप्टर जुन्या विमानतळावर ठेवण्यात आले होते. नेहमीप्रमाणे त्याची तपासणी सुरू असताना इंधन टाकीमध्ये दगड आणि आजूबाजूला माती असल्याचे आढळून आले. त्यानंतर अनिल धीरूबाई अंबानी समुहातर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी हे शुक्रवारी समुहातील नऊ अधिकाऱ्यांसह याच हेलिकॉफ्टरमधून नवी मुंबई येथील कंपनीच्या नॉलेज सेंटरला जाणार होते. ते दर गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी हेलिकॉप्टरमधून नवी मुंबईला जातात. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीत दगड टाकून घातपात घडविण्याचा कट असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या हेलिकॉप्टरच्या देखभालीची जबाबदारी सांभाळणाऱ्या एअर वर्क्‍स या कंपनीने आपण पोलिसांना चौकशीत सहकार्य करीत असल्याचे सांगितले.