Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

चंद्रा अय्यंगार यांच्यावरील ताशेरे ‘मॅट’ने मागे घेतले
मुंबई, २४ एप्रिल/प्रतिनिधी

 

न्यायालयीन अवमानाच्या (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) एका प्रकरणात वारंवार सांगूनही हजर न राहणे किंवा स्वत:चे उत्तरही सादर न करणे याबद्दल कमालीची नाराजी व्यक्त करीत राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त प्रधान सचिव चंद्रा अय्यंगार यांच्यावर मारलेले कडक ताशेरे आणि हे ताशेरे अय्यंगार यांच्या सेवापुस्तकात (सव्‍‌र्हिस बूक) प्रतिकूल शेरे म्हणून नोंदविण्याचा दोन आठवडय़ांपूर्वी दिलेला आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) आता मागे घेतला आहे.
मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक वैद्यकीय अधिकारी डॉ. (श्रीमती) पुष्पलता सोनावळे यांनी त्यांच्या एका प्रकरणात दिलेल्या आदेशाचे पालन केले गेले नाही म्हणून ‘कन्टेम्प्ट’चा अर्ज केला आहे. आता अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) होण्याआधी अय्यंगार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव होत्या. त्यामुळे आदेशाचे पालन का झाले नाही याचे उत्तर त्यांनी देणे अपेक्षित होते. मात्र वारंवार सांगूनही अय्यंगार स्वत: हजर राहिल्या नाहीत किंवा प्रतिज्ञापत्र करून आपले म्हणणेही मांडले नाही म्हणून ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. डॉ. एस. राधाकृष्णन व सदस्य अवधेश प्रसाद सिन्हा यांच्या खंडपीठाने अय्यंगार यांच्यावर कडक ताशेरे मारले होते आणि ते त्यांच्या ‘सेवापुस्तका’त नोंदविणायाचा आदेश ८ एप्रिल रोजी दिला होता. आता त्याच खंडपीठाने आपला हा आदेश पूर्णपणे मागे घेतला आहे. मात्र श्रीमती सोनावळे यांनी दाखल केलेले ‘कन्टेम्प्ट’चे प्रकरण पुढे सुरु राहील, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले.
अय्यंगार यांनी प्रतिज्ञापत्रात केलेला खुलासा पटणारा आहे. सरकारच्या दोन विभागांमधील समन्वयाच्या अभावे न्यायाधिकरणाच्या आदेशांविषयी त्या व्यक्तिश: अनभिज्ञ होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांनी न्यायालयीन आदेशांची हेतूपुरस्सर अवहेलना केली, असे दिसत नाही. शिवाय अय्यंगार यांनी झाल्या प्रकाराबद्दल बिनशर्त दिलगिरी व्यक्त करून भविष्यात न्यायाधिकरणाच्या आदेशांचे पालन होण्याच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे आम्ही आमचा आधी दिलेला आदेश पूर्णाशाने मागे घेत आहोत, असे खंडपीठाने नमूद केले.
या सुनावणीत अय्यंगार यांच्यासाठी विशेष ज्येष्ठ वकील के.एस. तलसानिया व सरकारी वकील डी.बी. खैरे यांनी तर मूळ अर्जदार श्रीमती सोनावळे यांच्यासाठी अ‍ॅड. अरिवद बांदिवडेकर यांनी काम पाहिले.