Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाची ग्वाही
‘जिवाची बाजी लावून जनतेचे रक्षण करू!’
मुंबई, २४ एप्रिल/नाटय़ प्रतिनिधी

 

२६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शर्थीने झुंजणाऱ्या मुंबई पोलीस दल व अग्निशमन दलाचा आज मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला; तेव्हा समस्त उपस्थित मुंबईकरांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. या भारावल्या क्षणी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि अग्निशमन दलाचे प्रमुख प्रताप करगोपीकर यांनी, ‘आम्ही आमच्या जिवाची बाजी लावून जनतेचे रक्षण करू,’ अशी नि:संदिग्ध ग्वाही दिली.
षण्मुखानंद सभागृहात मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ६७ व्या स्मृतिदिनी संपन्न झालेल्या या सोहळ्यात प्रत्येकी अडीच लाख रु., सन्मानचिन्ह आणि चांदीचे तबक या स्वरूपातील मा. दीनानाथ पुरस्कार देऊन मुंबई पोलीस व अग्निशमन दलास स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याखेरीज साहित्य, चित्रपट, नाटय़, काव्य, संगीत आदी क्षेत्रातील योगदानाबद्दल कवी-चित्रपट गीतकार जावेद अख्तर, नाटय़-चित्रपट अभिनेते परेश रावल, बुजुर्ग अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर, शास्त्रीय संगीत, क्षेत्रातील उस्ताद रशीद खाँ, सवरेत्कृष्ट नाटय़निर्मितीबद्दल ‘चंद्रलेखा’ संस्थेचे मोहन वाघ (वादक : प्रेमगंध) यांना प्रत्येकी ५० हजार रु., सन्मानचिन्ह आणि चांदीचे तबक या स्वरूपातील मा. दीनानाथ पुरस्काराने गौरविण्यात आले. कवयित्री कै. शांता शेळके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा सरस्वती सन्मान पुरस्कार (५० हजार रु. व सरस्वतीची मूर्ती) कवयित्री उषा मेहता यांना प्रदान करण्यात आला. भारतरत्न लतादीदींच्या हस्ते आणि मंगेशकर कुटुंबियांतर्फे दिल्या गेलेल्या या पुरस्काराने आपण धन्य झाल्याची कृतज्ञ भावना सर्वच पुरस्कारविजेत्यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार म्हणजे माझ्याकरिता गंगास्थान आहे. आयुष्यात कुठल्याही प्रकारचे वाईट कृत्य, अप्रामाणिक काम माझ्या हातून घडू नये, ही जबाबदारी या सन्मानाने माझ्यावर आली आहे,’ असे भावोद्गार अभिनेते परेश रावल यांनी काढले. तर- ‘लतादीदींमुळेच मी चित्रपट गीतकार झालो,’ असे कृतज्ञतेने कवी व गीतकार जावेद अख्तर यांनी सांगितले. ‘मी शेवटपर्यंत नाटक-चित्रपटात काम करत राहावे, अशा सदिच्छा या पुरस्काराने मिळाल्याचे’ ज्येष्ठ नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर यांनी सांगितले.
दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्टस् यांनी आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यास रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती. प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले, तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘हृदयसंगीत’ ही मराठी-हिंदी गीतांची सुरेल मैफल रंगली. त्यात पं. हृदयनाथ मंगेशकर, देवकी पंडित, सोनाली राठोड, बेला शेंडे, हरिहरन, सलील कुलकर्णी यांचा सहभाग होता. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनीही यावेळी आपल्या कविता सादर केल्या. मंगला खाडिलकर यांनी सूत्रसंचालन केले.