Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
प्रादेशिक

जेट एअरवेजमध्ये पगारकपात
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

जागतिक मंदीचा तडाखा आणि आर्थिक तोटय़ामुळे देशातील सर्वात मोठी खासगी हवाई वाहतूक कंपनी जेट एअरवेजने गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ७५ हजारांहून अधिक पगार घेणाऱ्या जेटच्या कर्मचाऱ्यांचे पगार पुढील महिन्यापासून पाच ते २५ टक्क्यांची कमी करण्यात येणार आहेत.

अंबानींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधनटाकीत दगड; चारजण ताब्यात
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमधील इंधन टाकीमध्ये दगड आढळून आल्याप्रकरणी सहार पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. इंधन टाकीतील दगडांमुळे हेलिकॉप्टरचा स्फोट होण्याची शक्यता होती. त्यामुळे या प्रकारामागे घातपात घडविण्याचा कट होता का यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. या प्रकाराचे लक्षात घेऊन या प्रकरणाच्या तपासाची सुत्रे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती आज सहआयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

चंद्रा अय्यंगार यांच्यावरील ताशेरे ‘मॅट’ने मागे घेतले
मुंबई, २४ एप्रिल/प्रतिनिधी

न्यायालयीन अवमानाच्या (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) एका प्रकरणात वारंवार सांगूनही हजर न राहणे किंवा स्वत:चे उत्तरही सादर न करणे याबद्दल कमालीची नाराजी व्यक्त करीत राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त प्रधान सचिव चंद्रा अय्यंगार यांच्यावर मारलेले कडक ताशेरे आणि हे ताशेरे अय्यंगार यांच्या सेवापुस्तकात (सव्‍‌र्हिस बूक) प्रतिकूल शेरे म्हणून नोंदविण्याचा दोन आठवडय़ांपूर्वी दिलेला आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) आता मागे घेतला आहे.

मिलन सबवेवरील उड्डाणपूल रखडणार!
शाळेच्या भूखंडावर संक्रमण शिबीर बांधण्यास मनाई
मुंबई, २४ एप्रिल/प्रतिनिधी
विलेपार्ले (पू.) व सांताक्रुझ (प.) यांना जोडणाऱ्या सध्याच्या ‘मिलन सबवे’च्या ठिकाणी बांधायच्या प्रस्तावित उड्डाणपुलामुळे विस्थापित होणाऱ्या झोपडपट्टीवासियांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी विलेपार्ले (पू.) येथील प्राथमिक शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडावर ‘म्हाडा’तर्फे संक्रमण शिबीर बांधण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम मनाई केली. परिणामी हा प्रस्तावित उड्डाणपूल रखडण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाची ग्वाही
‘जिवाची बाजी लावून जनतेचे रक्षण करू!’
मुंबई, २४ एप्रिल/नाटय़ प्रतिनिधी
२६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शर्थीने झुंजणाऱ्या मुंबई पोलीस दल व अग्निशमन दलाचा आज मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला; तेव्हा समस्त उपस्थित मुंबईकरांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. या भारावल्या क्षणी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि अग्निशमन दलाचे प्रमुख प्रताप करगोपीकर यांनी, ‘आम्ही आमच्या जिवाची बाजी लावून जनतेचे रक्षण करू,’ अशी नि:संदिग्ध ग्वाही दिली.

न्या. टहलियानी ‘ऑन दि स्पॉट’!
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

अजमल कसाब याच्यावरील खटला चालविणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांची लागलीच दखल घेत गुरुवारी सायंकाळी आर्थर रोड तुरूंग परिसरात फेरफटका मारून स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. कसाबवरील खटल्यासाठी परिसरात ठेवण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्त आणि नाकाबंदीमुळे त्रस्त झालेल्या नागरिक आणि व्यावसायिकांनी दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी करताना न्यायालयाने न्या. टहलियानी यांचीच आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. हे निर्देश जारी झाल्यानंतर लगेचच न्या. टहलियानी यांनी रात्री आठ वाजेपर्यंत परिसरात फेरफटका मारला आणि स्थानिक तसेच व्यावसायिकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. एवढेच नाही तर तुरूंगातच असलेल्या टेहळणी मनोऱ्यावरूनही त्यांनी परिसराची पाहणी केली.