Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लोकसत्ता-कॅम्पस मूड कॅम्पेनला एमईटीतही उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी

साठय़े महाविद्यालयामध्ये लोकसत्ता-कॅम्पस मूडच्या मोहिमेची यशस्वी सुरुवात केल्यानंतर ‘लोकसत्ता-कॅम्पस मूड’ टीमने त्याच दिवशी दुपारी वांद्रे येथील एमईटी महाविद्यालयात

 

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मोहिमेच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. एमईटी महाविद्यालयातील तरुणांशी इंग्रजीतून तरुणांशी संवाद साधण्यात आला. या विद्यार्थ्यांनी अतुल कुलकर्णीवर प्रश्नांचा अक्षरश: पाऊस पाडला. पक्षाला मत द्यावे की व्यक्तीला या प्रश्नाला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले की, माझा कल खरेतर पक्षाची विचारसरणी बघून त्या पक्षालाच मत देण्याकडे आहे. पण कधीतरी अशी परिस्थिती उद्भवते की तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. अशा वेळी डोक्याने विचार करुन मत दिले पाहिजे. यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले. गेल्या निवडणुकीच्यावेळी त्यांच्या मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे गोविंदाला उमेदवारी दिली होती व भाजपचे उमेदवार होते राम नाईक. त्यामुळे खरेतर मला भाजपची विचारसरणी पटत नसली तरी गोविंदा पुढची पाच वर्षे माझे प्रतिनिधित्व करणार हेही मला पटत नव्हते. त्यामुळे मग शेवटी मी राम नाईक, पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मत दिले, असे त्यांना सांगितले.
राजकीय पक्ष वा राजकारणी अभिनेत्यांना प्रचारात आणतात. त्याबद्दल एक अभिनेता म्हणून तुमचे मत काय असे विचारले असता, कुलकर्णी म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी प्रचार करताना अभिनेत्यांची मदत घेतली जाते या गोष्टीला सर्वसामान्य मतदारच जबाबदार नाही का? प्रचार करताना आपला आवडता अभिनेता असला की त्याला बघण्यासाठी लोक गर्दी करतात. राजकारण्यांना तेच हवे असते. केवळ एखादा अभिनेता तिथे आहे म्हणून आपण तिथे जातो. हे जर बंद झाले तर आपोआपच हे प्रकारही थांबतील.
आपल्याकडे सध्या उत्तम उमेदवार नाही. त्यामुळे वाईट आणि अधिक वाईट अशा दोन प्रकारांत निवड करण्यावाचून आपल्याला दुसरा पर्याय नाही, असे कुलकर्णी यांनी सांगताच, एमईटीचे संचालक (मार्केटिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन) जे. जी. इराणी म्हणाले की, साधी नोकरी शोधताना संबंधित व्यक्तीला खूप मोठय़ा प्रक्रियेतून जावे लागते. मुलाखतीला सामोरे जावे लागते. मग तशीच प्रक्रिया नेत्यांच्या बाबतीत का असू नये? आपण त्यांना निवडून देताना, त्यांनाही मुलाखतीला सामोरे जावे लागेल अशा प्रकारची काही सोय करता येऊ शकते व तसे झाले तर आपल्याला चांगले उमेदवार मिळतील. या मुद्दय़ावर बोलताना कुलकर्णी म्हणाले की, हा उपाय जरी चांगला असला तरी तो कितपत अंमलात येऊ शकेल याबद्दल शंका वाटते. त्यामुळे आपण आपली जबाबदारी ओळखणे हाच त्यावरील उपाय आहे. कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेजच्या चिफ कोर्स को-ऑर्डिनेटर प्राचार्य मयुरा अमरकांत यांनी आपण इतके दिवस मतदानासाठी नावनोंदणी करण्यासाठी टाळाटाळ करत होतो. मात्र आता या कॅम्पेननंतर मी आवर्जून मतदान करणार असल्याचे सांगून ही मोहिम खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याची पावती दिली. प्रिन्सिपल ऑफ फार्मसी डॉ. आभा दोशी यावेळी उपस्थित होत्या.
आज ठाणे-डोंबिवलीत
अतुल कुलकर्णी यांच्या ‘पहिले ते राजकारण' या लेखावरील प्रतिक्रिया म्हणून सकारात्मक मतदानासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसत्ता कॅम्पेन'मध्ये अभिनेते अतुल कुलकर्णी २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता डोंबिवली येथील पेंढरकर महाविद्यालयात आणि दुपारी ३ वाजता ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात तरूणांशी संवाद साधणार आहेत. पेंढरकर महाविद्यालयातील कार्यक्रमास ‘लोकसत्ता'चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर तर ज्ञानसाधना येथील सांगता कार्यक्रमास ‘लोकसत्ता'चे संपादक कुमार केतकर म्हणून पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.