Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘प्रिया हमारी दिदी है!’
प्रिया दत्त (काँग्रेस)

सकाळी साडेनऊपासून वांद्रे येथील जे. जे. कॉलनी परिसरात रहिवाशांची आणि कॉग्रेस कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. प्रत्येक जण पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे

 

आपापल्या स्थानावर उभा होता. कोणाच्या हातात पक्षाचे झेंडे होते तर काही जण हातात हार घेऊन उभे होते. काही रहिवाशी आणि कार्यकर्ते तेथील स्थानिक नगरसेवक राजा खान यांच्यासोबत फोटो काढत होतो. हे सर्व सुरू असेपर्यंत मॅडमची गाडी आली आणि परिसरातील वातारणच बदलून गेले. सर्वाना प्रतीक्षा होती ती खासदार प्रिया दत्त यांची. आल्या आल्या त्यांनी हात जोडून सर्वांना अभिवादन केले आणि सर्वांनी मग एकच जल्लोष केला. या जल्लोषातच प्रिया दत्त यांनी जे. जे. कॉलनी परिसरातील गजबजलेल्या चिंचोळ्या रस्त्यावरून पदयात्रेस सुरूवात केली.
स्थानिक आमदार बाबा सिद्धीकी यांचा बालेकिल्ला असलेल्या या परिसरातील झोपु योजनेंतर्गत विकसित झालेल्या इमारतीमधील रहिवाशांनी प्रिया दत्त यांचे जंगी स्वागत केले. प्रत्येक इमारतीवरून पृष्पवृष्टी होत होती. फटाक्यांची आतषबाजी होत होती. परिसरात कोणतातरी सण साजरा होत असल्याचेच भासत होते. स्थानिकांकडून ‘प्रिया हमारी दिदी है’, ‘हमारी नेता कैसी हो, प्रिया दिदी जैसी हो’ अशा घोषणा देत स्वागत केले. सुमारे पाऊणशे कार्यकर्ते आणि या ताफ्याच्या मागे धावणारे त्यांचे चाहते त्याच जोशात होते.
या प्रचार फेरीत प्रिया दत्त यांनी जे. जे. कॉनलीनंतर नर्गिस दत्तनगर, राहूलनगर, ट्रान्झिट कॅम्प, बाझार रोड, इंदिरानगर, राजीवनगर, नुरानी शाह मार्ग, बंदर वाडी, मदन वाडी, हज मोहमंद मुल्ला लेन, कुरेशीनगर, महाराष्ट्रनगर आणि शास्त्रीनगर मधील मतदारांची प्रत्यक्ष भेट घेतली. या वेळी प्रिया दत्त यांच्यासोबत आमदार सिद्धिकी यांच्यासह नगरसेविका कविता रॉड्रिक्स, नगरसेवक असीफ कुरेशी, नगरसेवक राजा खान, माजी नगरसेवक आणि पक्षाचे तालुका निवडणूक प्रमुख प्रकाश बोबडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडासा उशीर झालेल्या प्रिया दत्त यांनी एवढी मोठी फेरी मॅरेथॉन वेगात पूर्ण केली. तरीही वाटेत जेष्ठ नागरिक आणि माता-भगिनिंनी त्यांना पुढे सरसावून आशीर्वाद दिला. काही कारणांमुळे रखडलेल्या झोपु योजनेतील बाधित कुटुंबांनी ‘आम्हाला घरे द्या अन्यथा मत नाही’ असा थेट इशारा दिला. मात्र आपण खासदारकीच्या काळातही हा प्रश्न हाताळला आहे आणि नंतरही हाताळणार आहोतच असे प्रिया दत्त यांनी सांगताच त्या नागरिकांचा तोरा कुठल्याकुठे निघून गेला. टोपी मिळेल या आशेने अनेक लहान मुलेही ‘प्रिया दिदी’ म्हणत आपल्या आई-वडिलांसोबत प्रचारयात्रेत सहभागी झाले होते. दोन दिवसांपासून प्रिया दत्त यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या मतदारांनी ‘प्रिया हमारी दिदी है’, ‘हमारी नेता कैसी हो, प्रिया दिदी जैसी हो’ याच जल्लोषात यात्रेची सांगता केली.