Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘क्यों पडे हो चक्कर में..’
महेश जेठमलानी (भाजप)

सकाळी साडेनऊच्या सुमारास गळ्यात भाजपचा स्कार्फ घालून शिवसेना-भाजप युतीचे झेंडे लावलेल्या गाडीतून अ‍ॅड. महेश जेठमलानी वांद्रे येथील एबी एक्झिक्युटिव्ह अर्पाटमेंटमधून

 

वाकोलाच्या दिशेने निघाले. वाकोलामधील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची गजबज सुरू होती. पक्ष कार्यालयात पोहोचताच सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जेठमलानी आपल्या ३०-३५ कार्यकर्त्यांसह पदयात्रेसाठी निघाले.
संथपणे सुरू झालेल्या या यात्रेत शिवसेनेचे उपविभाग प्रमुख परब यांनी चांगलाच रंग आणला. जोरजोरात घोषणाबाजी करीत त्यांनी परिसरातील मतदारांचे पदयात्रेकडे लक्ष वेधून घेतले. वाकोला येथील भाजपच्या निवडणूक कार्यालातून निघालेली ही यात्रा पाटक गाला कॉलेज येथून उजवीकडे धोबी घाटच्या दिशेने निघली. येथे वाटेत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला भेट देत हात उंचावून जेठमलानी मत देण्यासाठी सांगत होते. याचवेळी परब यांनी विविध घोषणांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. यानंतर ही यात्रा या परिसरातील युतीच्या बालेकिल्ल्यात गेली. तेथे जेठमलानी यांनी जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्याला मत देण्याचे आवाहन केले. यानंतर ते वाकोला पूल परिसरातील ओम साई चाळ, गणेश चाळ कमिटी, नवजीवन रहिवाशी संघ आदी विभागांत गेले. येथील गरीब मतदारांना न्याय मिळावा, यासाठी आपण न्यायालयात मोफत खटला लढविणार असल्याचे आश्वासनही अ‍ॅड. जेठमलानी यांनी दिले तेव्हा लोकांमध्ये उत्साह संचारला. २६ जुलै २००५ मधील पुराच्या वेळी युतीने परिसरातील स्थानिकांना केलेल्या मदतीची जाणीव करून देत जेठमलानी यांनाच मत देण्याचे आवाहन केले. मग पुन्हा ‘काई नही है टक्कर में, क्यों पडे हो चक्कर में’ अशी घोषणा देत कार्यकर्त्यांनी याच परिसरातील सिद्धेश्वर चाळ, अणुशक्ती चाळ कमिटी, डॉ. व्ही सुब्रमण्यम चाळ आदी चाळीतील रहिवाशांची भेट घेतली. वाटेत प्रत्येक ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचे औक्षण आणि फटाक्यांच्या आतीषबाजीत स्वागत करत होते. प्रचाराच्यावेळी परिसरातील जेष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच जण जेठमलानी यांच्या अभिवादनाचा स्वीकार करीत होते. पुढे दुर्गा माता मंदिरात दर्शन घेऊन जेठमलानी यांनी वाघरीपाडा येथील विविध चाळीतील रहिवाशांची प्रत्यक्ष भेट घेतली. यानंतर उत्कर्ष नगर, मिलिंद नगर, वाकोला पाईप लाइन, गावदेवीनगर, इंदिरानगर या परिसरातून बाहेर आल्यावर भाजी वाडा येथे जेठमलानी आपल्या परिवर्तन रथात बसले आणि मग यात्रा पुढे पुन्हा सुरू झाली. यावेळी रथात आपल्या घोषणांनी प्रचार रंगवलेले परब, भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पराग अळवणी आदी कार्यकर्ते सामील झाले. रथातून जेठमलानी यांनी खांडवाला कंपाऊंड येथील झोपु योजनेअंतर्गत उभ्या राहिलेल्या इमारतींमधील रहिवाशांची भेट घेतली. ‘काई नही है टक्कर में, क्यों पडे हो चक्कर में’ या घोषणेमध्ये ही यात्रा पुन्हा वाकोला मार्गावरील भाजपाच्या निवडणूक कार्यालयात येऊन संपली.