Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘नगारा’ लोकसभेत पाठवा..
शिल्पा सरपोतदार (मनसे)

वाकोला पुलाजवळून सायंकाळी साडेचारच्या सुमारास मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार

 

यांची प्रचारफेरी सुरू होणार होती. मात्र वाकोला येथेच मनसैनिक आणि काही स्थानिकांचा आग्रह त्यांना मोडता आला नाही. त्यांचे जोरदार स्वागत झाले आणि स्वागत स्वीकारता स्वीकारता सायंकाळचे साडेपाच कधी वाजले ते त्यांनाही कळले नाही. त्यानंतर मात्र खार सबवे, गोळीबार रोड, आंबेवाडी, डवरीनगर अशी दरमजल करीत प्रचारफेरी सुरू झाली.
‘राज ठाकरे यांचा विजय असो’, अशा घोषणा देत तीनशे ते साडेतीनशे मनसैनिकांचा जमाव ‘नगारा’ला लोकसभेत पाठविण्याचे आर्जव करीत होता. यामध्ये महिला मनसैनिकांची संख्या लक्षणीय होती. गळ्यात मनसेचा दुपट्टा आणि डोक्यावर पांढरी टोपी, हातात राज ठाकरे यांचे कटआऊटस्, मनसेची भूमिका मांडणारा प्री रेकॉर्डेड संच असा ताफा घेऊन निघालेल्या प्रचारफेरीत एक महिला तर ध्वनिक्षेपकावर न थकता ‘शिल्पा सरपोतदार यांना लोकसभेत पाठवा’ असे ओरडून सांगत होती. खार सबवे ते गोळीबार रोड आणि आंबेवाडीच्या आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर दुतर्फा फेरीवाल्यांच्या गर्दीत वाट काढीच शिल्पा सरपोतदार यांची प्रचारयात्रा पुढे सरकत होती. प्रामुख्याने मुस्लिम, उत्तर भारतीय समाजाचे प्राबल्य असलेल्या गोळीबार रोड, खार सबवे येथे उत्सुकता म्हणून प्रचारफेरीकडे पाहणाऱ्यांमध्ये परप्रांतीय महिलांची संख्या चांगलीच होती. काही उत्तर भारतीय महिलांनीही शिल्पा सरपोतदार यांना अभिवादन केले. त्यापैकीच एक महिला म्हणाली की, कौन है यह मॅडम? ‘वो राज ठाकरे है ना, उसीसे जुडी हुई है..’ असेच एकीने तिला सांगितले. त्यानंतरही तिच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया बदलली नाही.
आंबेवाडीत प्रचारयात्रेचे खास स्वागत झाले. कदाचित त्या ठिकाणी मनसेचा जोर असावा. शिल्पा सरपोतदार प्रचारगाडीतून खाली उतरल्या. स्थानिकांशी चार शब्द बोलल्या. लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. डवरीनगरातही हाच अनुभव. त्यानंतर प्रचारयात्रा आली मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांच्या बालेकिल्ल्यात.. खेरवाडीत. तेही प्रचारयात्रेत सामील झाले. याठिकाणी मात्र प्रत्येक इमारतींतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली तर अनेक ठिकाणी शिल्पा सरपोतदार यांची महिलांनी ओवाळणी केली. आपल्याला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगारा लोकसभेत पाठवा या आवाहनाचे खेरवाडीत जंगी स्वागत झाले. मजल दरमजल करीत प्रचारयात्रा सासरे मधुकर सरपोतदार यांच्या कामगार संघटनेच्या कार्यालयाजवळ आली तेव्हा शिल्पा सरपोतदार खाली उतरल्या आणि त्या कार्यालयात गेल्या. बाजुलाच प्रतिस्पर्धी उमेदवार महेश जेठमलानी यांचे छोटेखानी कार्यालय होते. तेथूनही अभिवादन आल्याने शिल्पा सरपोतदारही हात उंचावून त्यास प्रतिसाद दिला. खेरवाडीतील प्रत्येक इमारतीच्या आवारात जंगी स्वागत होत होते. अखेरीस रात्री आठच्या सुमारास बेहरामपाडय़ात प्रचारयात्रेचा समारोप झाला. मनसैनिकांना अभिवादन करून कुर्ला आणि चांदिवली येथील जाहीर सभांसाठी त्या रवाना झाल्या.