Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ताई-माई-आक्का.. सगळीकडे आश्वासनांचा भुलभलैय्या
संजय बापट

राज्याच्या बहुतांश भागातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान गुरुवारी संपल्यानंतर प्रचाराच्या तोफा आणि

 

कार्यकर्त्यांच्या झुंडी आता मुंबई-ठाण्याकडे सरकू लागल्या आहेत. तब्बल २६ विधानसभा मतदार संघ असलेल्या ठाणे जिल्ह्यावर अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले असून त्याची प्रचीती भिवंडी लोकसभा मतदारसंघातही येत आहे. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघाचा पहिला खासदार होण्याचा बहुमान मिळविण्यासाठी सुरू झालेल्या मॅरेथॉनमध्ये सेना-भाजप युतीचे जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे सुरेश टावरे, सपाचे आर. आर. पाटील, बसपाचे व्ही. जी. पाटील, मनसेचे डी. के. म्हात्रे, अपक्ष विश्वनाथ पाटील यांच्यासह १६ उमेदवार धावत आहेत. प्रचाराला अवघे काही दिवसच हाती असल्याने सगळेच उमेदवार धाव-धाव धावत आहेत. तर त्यांच्यात जिंकण्याची जिद्द कायम राहावी यासाठी पाठीराखेही बाजूने जल्लोष करीत पळत आहेत. विविध अडथळ्यांची ही मॅरेथॉन कोण पार करते याची मजाही नागरीक घेतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील बहुतांश सर्वच उमेदवारांना हा मतदार संघ आणि मतदारांनाही उमेदवार नवखे आहेत. जगन्नाथ पाटील यांचा कल्याण-बदलापूर भागात वरचष्मा असल्याने त्यांनी आपल्या प्रचाराचा भर भिवंडी-वाडा-शहापूर या भागात ठेवला आहे. तर सुरेश टावरेंच्या फौजा शहापूर, मुरबाड, कल्याण भागातच मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. विश्वनाथ पाटील ग्रामीण भागातील तर आर. आर. पाटील यांनी भिवंडीतील आपल्या होमपीचवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
हा मतदार संघ भौगोलिक रचनेच्या दृष्टीने प्रचंड मोठा असल्याने गावपाडय़ातील मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यातच प्रचाराबरोबर उन्हाचाही पारा वाढत असल्याने सकाळ आणि संध्याकाळीच प्रचाराला वेळ मिळत आहे. परिणामी, कमी कालावधी आणि कमी वेळात १४ लाख मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना मात्र रात्र थोडी सोंगे फार याचा अनुभव येत आहे.
स्वत:ची आणि पक्षाची भूमिका मांडणारी प्रचारपत्रके घरोघरी वाटण्याबरोबरच ग्रामीण भागात गावोगावी चावडी सभा, संस्था, मंडळांच्या भेटीगाठी, शहरी भागात मोहल्ला बैठका आणि चौक सभांवर बहुतांश उमेदवारांनी भर दिला आहे. मतदारसंघाची परिपूर्ण माहिती नसल्याने उमेदवारांना सहकारी पक्षांच्या नेतेमंडळींवर अवलंबून राहावे लागत आहे. ताई, माई, आक्का, काका, मामा म्हणत मतदारांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या प्रश्नांची आपल्याला कशी माहिती आहे आणि ते प्रश्न सोडविण्यात विरोधक कसे अपयशी ठरलेत आणि आपण हे प्रश्न कसे सोडवू हे पटवून देण्यावर अनेक उमेदवारांचा भर दिसतो. विशेष म्हणजे आजवर कधीही एखाद्या मोहल्ल्यात अथवा पाडय़ात न गेलेले नसतानाही आपण जणू येथेच राहतो, अशा राजकीय चातुर्याने हे उमेदवार मतदारांवर भुरळ घालताना दिसत आहेत.
आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना लालकृष्ण आडवाणी पंतप्रधान होणे का महत्त्वाचे आहे हे भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याउलट राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या चांगल्या कामांची जंत्री आघाडीचे कार्यकर्ते बजावताना दिसत आहेत. सपाचे उमेदवार आर. आर. पाटील आपण भिवंडी भागाचे प्रश्न कसे सोडविले हे सांगत आहेत. मात्र त्यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे मुलगा माजी महापौर विलास पाटीलच चालवत आहेत.
प्रचाराचा पारा आता खऱ्या अर्थाने या आठवडय़ात चढेल. कारण अन्य भागातील निवडणुका संपल्या असल्याने नेत्यांच्या तोफा आता भिवंडीकडे येत आहेत. मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहापूर, मुरबाड आणि भिवंडीत अशा जाहीर सभा घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या तीनही जाहीर सभांमध्ये भूमिपुत्र आणि परप्रांतीय, विद्यमान पक्षांची जनतेबद्दलची अनास्था या मुद्दय़ांवरच भर दिला. परप्रांतीय आणि विद्यमान पक्षच मराठी आणि भूमिपुत्रांच्या मुळावर आले असून निवडणुकीतही तुम्हाला अंधारात ठेवून घोळ घातले जात आहेत.
त्यामुळे ही निवडणूक म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मराठी आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची लढाई असून सर्वानी जागे राहा, गाफील राहिलात तर पश्चात्तापाचा हात कपाळावर मारून घेण्याची आफत येईल, असा इशारा देत राज ठाकरे मतदारांना जागृत करीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मनसेची भूमिका मांडणारे व आपल्या आंदोलनाचे समर्थन करणारे राज ठाकरेंचे पत्रक सर्वत्र वाटले जात आहे. ठाकरेंच्या तीनही सभांना चांगली गर्दी झाल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांत उल्हास आहे. मात्र तरुणांची ही गर्दी मतात परिवर्तित होईल का?