Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

घरंदाज वारसा
चार्लस् डार्विनला एका प्रतिष्ठित घराण्याचा वारसा लाभला.. इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यातील श्रूसबेरी या छोटय़ा गावातील घरंदाज डार्विन कुटुंबात माऊंट या त्यांच्या पिढीजात निवासस्थानी चार्लस्चा जन्म झाला.
चार्लस्चे वडील डॉ. रॉबर्ट डार्विन होते एक प्रतिष्ठित आणि प्रथितयश डॉक्टर.. त्यांची पत्नी, चार्लस्ची आई सुसान्ना वेजवुड चिनी मातीची आकर्षक भांडी बनविणाऱ्या सुप्रसिद्ध वेजवुड घराण्यातली.. चार्लस् हे या दाम्पत्याचे पाचवे अपत्य अन् दुसरा मुलगा.. १२ फेब्रुवारी १८०९ रोजी जन्मलेला.. सधन कुटुंबात जन्मल्यामुळे सुबत्तेत वाढलेला.
पारंपरिक धर्मसंस्कारानुसार नऊ महिन्याचा असताना चार्लस्चा श्रुसबेरी येथील सेंट छाडस् चर्चमध्ये बाप्तिस्मा करण्यात आला.
तत्कालीन समाज परंपरावादी असला तरी त्या काळी चर्चशी फटकून वागणारे चार्लस्चे आजोबा इरॅस्मस डार्विन आधुनिक पुढारलेल्या विचारसरणीचे अग्रगण्य विचारवंत होते.. पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या निर्मितीसंबंधी तत्कालीन धार्मिक विचारसरणी त्यांना मान्य नव्हती.. चार्लस्च्या या डार्विन घराण्याची गेली पाचशे वर्षांहून अधिक काळ चालत आलेली परंपरागत वंशावळ आज ज्ञात आहे.. तर चार्लस्च्या आजोळकडून वेजवुड घराणे हे राजे हेन्री पहिले वंशज होते.. बालपणी चार्लस् होता लाजाळू, कमालीचा बुजरा पण अत्यंत खटय़ाळ अन् खोडकर.. केवळ आठ वर्षांच्या कोवळ्या वयात चार्लस्च्या आईचं कॅन्सरच्या आजारानं निधन झालं अन् चार्लस्चं मातृछत्र हरपलं.. पुढे त्याचं संगोपन चार्लस्च्या त्याच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणींनी केलं.. छोटय़ा चार्लस्ला घरात लाडानं ‘बॉबी’ तर कधी ‘चार्ली’ म्हणायचे..
चार्लस्चा विवाह वेजवुड घराण्यातील एम्मा वेजवुड या त्याच्या मामाच्या मुलीबरोबर झाला.. डार्विन एम्माचं नातं विशेष खास असं होतं. डार्विन एम्माच्या सहवासात पूर्णत: सुखी- समाधानी होता.. तसं पाहिलं तर लग्नानंतर डार्विनला सततच्या आजारपणानं ग्रासलं होतं. सारखं कुठलंतरी दुखणं चार्लस्च्या कायम पाठी लागलेलं असे. पण आपली पत्नी एम्माचा सहवास डार्विनला शांती व आनंद देणारा ठरला.. एम्मा डार्विनला त्या काळच्या प्रसिद्ध कादंबऱ्या वाचून दाखवी.. एम्माला संगीताचा विशेष छंद होता.. ती पियानो उत्तम वाजवीत असे.. कालांतराने डार्विन- एम्मा या दाम्पत्याला एकूण दहा अपत्यं झाली. डार्विनची मुलगी हेन्रिटा किंवा एटी डार्विननं आपली आई एम्मा डार्विनची खासगी पत्रं संकलित करून १९०४ साली प्रकाशित केली.. डार्विनचा पुत्र फ्रान्सिस डार्विन प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ होता. डार्विनला तो वनस्पतीवरील प्रयोग करण्यात मदत करीत असे.. डार्विनच्या अनेक पत्रांचं संकलन तसेच डार्विनच्या आत्मचरित्राचं संपादन करून फ्रान्सिसनं ते प्रकाशित केलं. डार्विनचा मोठा मुलगा फ्रान्सिस डार्विन आपल्या वडिलांविषयी त्याच्या आत्मचरित्रात लिहितो.. ‘‘माझ्या बाबांना घरासमोरील बगीच्यात येरझाऱ्या घालायला खूप आवडायचे.. बगीच्यातील गवतावर बसणे तर त्यांना खास आवडत असे.. बगीच्यातील डेरेदार लिंबाच्या झाडाखाली झाडाच्या बुंध्यावर डोकं टेकवत टोपीखाली चेहरा झाकून माझे बाबा तासन्तास पहुडलेले मला आठवतात.. तेव्हा मला राहून- राहून सारखं वाटत राही की बाबा सतत एवढा कसला बरं विचार करीत असतील..’’
त्याची लाडकी कन्या अ‍ॅनेचा क्षयरोगाने झालेला अकाली अंत डार्विनला जिव्हारी चटका लावून गेला.. या घटनेने डार्विनचा देवावरचा विश्वास उडाला.. तेव्हापासून डार्विनने आपल्या कुटुंबासोबत चर्चमध्ये जाणेच सोडून दिले..
असा होता चार्लस् डार्विन.. अत्यंत कुटुंबवत्सल.. घरंदाज वारसा लाभलेला..
‘‘मला आठवते की माझ्या वडिलांना फुलास अत्यंत नाजूकपणे स्पर्श करायला आवडे.. त्यात अगदी लहान मुलासारखे कुतूहल व समाधान असे’’ - फ्रान्सिस डार्विन