Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

मतदानयंत्रे जमा होण्यास विलंब
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील ३ हजार ४४२ मतदान केंद्रांवरील मतदानयंत्रे जमा करण्यात निवडणूक यंत्रणेला गुरुवारची संपूर्ण रात्र व आजचा (शुक्रवार) दिवसही घालवावा लागला. आज सायंकाळी साडेचार वाजता सर्व यंत्रे ‘स्ट्राँग रूम’मध्ये ठेवून तिला सील ठोकण्यात आले. जिल्ह्य़ातील १२ विधानसभा मतदारसंघांचे विस्तारलेले क्षेत्रफळ लक्षात घेता मतदानयंत्रे नगरला पोहोचण्यास मध्यरात्र होईल हे प्रशासनाने गृहित धरले होते. प्रत्यक्षात मात्र आज सकाळपर्यंत अकोले व त्या भागातील अन्य ठिकाणची मतदानयंत्रे नगरमध्ये पोहोचली नव्हती.

खिद्रापूरची स्त्री शिल्पं
पंचवीस वर्षांपूर्वी इथं अक्षरश उकिरडा होता. पण पुरातत्व खात्यानं लक्ष घातलं, म्हणून या मंदिराचं हे असं रूप आपण पाहू शकतो. रफिक उत्साहानं सांगत होता. रफिक हुपरीचा. कोल्हापूरजवळच्या गावचा कवी, लेखक, समीक्षक. प्राध्यापकाची नोकरी आणि घरं बांधण्याचं आवडीचं काम मनापासून करणारा. बरोबरीनं मित्रत्वाचा लळा-जिव्हाळा सांभाळणारा, जोपासणारा. याआधी त्यानं अनेकदा अनेक मित्रांना हे क ोपेश्वराचं हरिहरेश्वरचं मंदिर दाखवायला आणलं होतं. पुन्हा पुन्हा बघताना त्याचं स्वतचं कुतूहल जरासंही कमी झालेलं नव्हतं. आता तर त्याला आवडणारे लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार त्याच्याबरोबर होते.

मतदानाची अंतिम आकडेवारी
‘नगर’मध्ये ५२.०६, तर ‘शिर्डी’त ५०.४२ टक्के
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत मिळून ५१.३० टक्के मतदान झाले. नगरमध्ये ५२.०६ टक्के, तर शिर्डीत ५०.४२ टक्के मतदान झाले. शिर्डी मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४७.५५ टक्के संगमनेरमध्ये, तर सर्वात जास्त म्हणजे ५३.५३ टक्के शिर्डीत झाले. नगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४०.०२ टक्के नगर शहरात, तर सर्वात जास्त ५८.२२ टक्के शेवगावमध्ये झाले.

व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी गजाआड
एअरगन, तलवार जप्त; काही मुद्देमाल हस्तगत
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी
सहा तरुणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सायंकाळी जेरबंद केले. या टोळीकडून एअरगन, तलवार, चाकू, लोखंडी गज व मिरचीची भुकटी जप्त करण्यात आली. मध्यंतरी शहरातील व्यापाऱ्यांना लुटण्याच्या काही घटना घडल्या. त्यात हे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुटखाप्रकरणी धारिवाल कंपनीसह विक्रेता निर्दोष
अकरा वर्षांनंतर निकाल
श्रीगोंदे, २४ एप्रिल/वार्ताहर

माणिकचंद गुटखा तयार करताना अथवा वितरित करताना त्यात मॅग्नेशियम काबरेनेट हा आक्षेपार्ह घटक स्वतंत्रपणे मिसळला. तसेच त्यापासून शरीरास काही अपाय होऊ शकतो, या दोन्ही बाबी सिद्ध न झाल्याने आज येथील न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी धारिवाल टोबॅको प्रोडक्ट, घोडनदी या कंपनीला विक्रेत्यासह क्लीन चिट देत निर्दोष ठरविले. न्यायालयाने ११ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आज दिला.

इंडिकाची धडक बसून मोटरसायकलस्वार ठार
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

इंडिका मोटारीची धडक बसून मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास नगर-औरंगाबाद रस्त्यावर धनगरवाडी शिवारात हा अपघात झाला.
बाळासाहेब भास्कर टेमकर (२३ वर्षे, रा. जेऊर, ता. नगर) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी इंडिका (एमएच १६ ए. एफ ४२०८) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेअंमलदार नरवडे करीत आहेत.

हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन
कोपरगाव, २४ एप्रिल/वार्ताहर
तालुक्यातील कोकमठाणच्या माळवाडी येथील शेतमजूर अनिल वाळुंज यांच्या आठ दिवसांच्या मुलाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
या मुलाला जन्मतच ह्रदयाचा दोष निघाल्याने त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र, ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची व खर्चिक असल्याने यासाठी ४ लाख रुपये लागणार आहेत. श्री. वाळुंज मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवितात. म्हणून त्यांनी ही शस्त्रक्रिया बंगलोर येथील नारायण हृदयालय सुपरस्पेशालिटी क्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर येथे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १ लाख २५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तरी एवढी रक्कम गोळा करणे त्यांना शक्य नाही. दानशुरांनी बंगलोर येथील वैद्यकीय मदत खाते क्रमांक आयडी २५७३५ येथे आर्थिक मदत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शकुंतलाबाई गुरसळ यांचे निधन
कोपरगाव, २४ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या शकुंतला भागवत गुरसळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. विठ्ठलमहाराज वक्ते व संजीवनी कारखान्याचे कर्मचारी पंडित वक्ते यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या निधनाबद्दल ‘संजीवनी’चे अध्यक्ष बिपीन कोल्हे, उपाध्यक्ष सुभाष आव्हाड, संचालक संजय होन, बाळासाहेब वक्ते, माजी सभापती शिवाजीराव वक्ते आदींनी दुख व्यक्त केले.

रुक्मिणी दुर्गुडे यांचे निधन
राहाता, २४ एप्रिल/वार्ताहर

येथील सामाजिक कार्यकर्त्यां रुक्मिणी रंगनाथ दुर्गुडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. स्वातंत्र्यसैनिक रंगनाथ लक्ष्मण दुर्गुडे यांच्या त्या पत्नी, तर कोपरगाव तालुका खादी ग्रामोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष विलास दुर्गुडे यांच्या चुलती होत. (कै.) दुर्गुडे यांचा तिळवण तेली समाजाच्या कार्यात नेहमीच सहभाग असे. त्यांच्या पार्थिवावर गोदातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोणीच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल
राहाता, २४ एप्रिल/वार्ताहर

लोणी येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील एम. फार्म विभागाचा प्रथम वर्षांचा निकाल १०० टक्के लागला. प्रेरणा चव्हाण (६८ टक्के) प्रथम, रूपाली टिकाले (६६) द्वितीय, तर स्नेहा सोनवणे (६४) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. आर. पट्टण यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे खासदार बाळासाहेब विखे, शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे, संस्थेचे संचालक यू. एम. महेंदरकर यांनी अभिनंदन केले.