Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
नवनीत

जी व न द र्श न
लोभ आणि तृष्णा

’ लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे.
’ धनाचा सारखा वर्षांव होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात, की कामना ही अशक्य व दु:खकर आहे.
’ लोभातून दु:ख उत्पन्न होते. लोभातून भय निर्माण होते; लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दु:ख आणि भय यांपासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दु:ख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दु:ख आणि भय यांपासून मुक्तता लाभते.
’ जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाराचा द्वेष करू लागतो.
’ कामभोगापासून दु:ख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्त नाही त्याच्या वाटय़ाला भय आणि दु:ख येत नाही.
’ जो शीलवान व प्रज्ञावान आहे, तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे, अशा पुरुषावर लोक प्रेम करतात.
’ कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यासंबंधी द्वेषभावना बाळगू नका.
’ ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही, असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे? श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दु:खाचा अंत करा.
’ स्वत: हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना साहाय्यही करू नका. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्यांचा धम्म)

कु तू ह ल
संपातचलन
संपातचलन म्हणजे काय? हे संपातचलन कोणत्या गतीने होते? व या संपातचलनाचे परिणाम काय होतात?

आपली पृथ्वी फुगत चालली आहे अशी कल्पना करा. तर पृथ्वीचे विषुववृत्त आकाशगोलाला टेकेल. त्यास आपण वैषुविकवृत्त म्हणूया. पृथ्वीच्या आसाच्या कलतेपणामुळे सूर्याचा आकाशातील मार्ग म्हणजे सूर्याचा राशीतून होणाऱ्या प्रवासाचा मार्ग वैषुविकवृत्ताला छेदतो. असे दोन बिंदू मिळतात. यांनाच संपातबिंदू म्हणतात. २१ मार्च रोजी सूर्य यापैकी एका संपातबिंदूवर असतो. यास वसंत संपातबिंदू म्हणतात. दुसरा २३ सप्टेंबरचा शरदसंपात. सूर्य-चंद्राच्या आकर्षणामुळे पृथ्वीच्या आसाचे वर्तुळाकार भ्रमण होते (मात्र कलतेपणा कायम राहतो.) या भ्रमणामुळे संपातबिंदू विशिष्ट नक्षत्रात स्थिर राहात नाहीत, हे संपातबिंदू हळूहळू मागच्या राशीत सरकतात. याचा महत्त्वाचा परिणाम असा होतो, की चांद्रमहिना आणि ऋतू यांची सांगड राहात नाही. आज चैत्र महिन्यात वसंत ऋतू असेल तर आणखी तेरा हजार वर्षांनी अश्विन महिन्यात वसंत ऋतू अनुभवायला येईल. त्याचप्रमाणे उत्तरायण आणि दक्षिणायन ही वेगवेगळय़ा महिन्यात होईल. भीष्माचा मृत्यू झाला तेव्हा माघ महिन्यात उत्तरायण होत असे, ते आता मार्गशीर्षांत होते. पृथ्वीच्या आसाच्या रेषेत जो तारा येतो तो आपणास स्थिर भासतो. इतर ताऱ्यांप्रमाणे तो उगवत-मावळत नाही. सध्या या ताऱ्याला आपण ध्रुव म्हणतो. पण आसाच्या मंद्र भ्रमणामुळे निरनिराळय़ा काळात वेगवेगळे तारे ध्रुवपदावर आपला हक्क सांगतात. अजून १२ हजार वर्षांनी अभिजित हा तारा ध्रुवपदी येईल. हासुद्धा संपात चलनाचा परिणाम आहे. पृथ्वीच्या आसाच्या या धिम्या प्रदक्षिणेचा काळ २६ हजार वर्षे आहे. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर तेच तेच तारे ध्रुवपदी येतात.
हेमंत मोने
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
ऑलिव्हर क्रॉमवेल
पार्लमेंट ही इंग्लंडच्या राजापेक्षा सर्वश्रेष्ठ संस्था आहे हे सिद्ध करून राजेशाहीवर कायमचा वचक निर्माण केला ऑलिव्हर क्रॉमवेलने. त्यांचा जन्म २५ एप्रिल १५९९ रोजी झाला. केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असतानाच ते राजकारणात पडले. जून १६६८ साली ते पार्लमेंटवर इंडिपेंडंट पक्षातर्फे निवडूनही आले. या सुमारास इंग्लंडच्या गादीवर स्टुअर्ड राजा पहिला जेम्स याने आपले अधिकार ईश्वरदत्त आहेत, अशी भूमिका घेतल्याने प्रजा नाराज झाली होती. पुढे त्याचा वारसदार पहिला चार्ल्स याने तर पार्लमेंटला न जुमानता राज्यकारभारला सुरुवात केली. तेव्हा पार्लमेंटने क्रॉमवेलच्या नेतृत्वाखाली सैन्य उभे केले. १६४५ च्या सुमारास आपल्या घोडदलाच्या जोरावर त्याने राजाच्या सैन्याचा पूर्ण पराभव केला आणि सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. राजावरच राजद्रोहाचा आरोप करून क्रॉमवेल यांनी राजाला चक्क फासावर चढवले आणि इंग्लंडच्या इतिहासात क्रॉमवेलच्या नेतृत्वाखाली प्रथमच प्रजासत्ताक राज्य स्थापन झाले.जवळजवळ दीड दशक इंग्लंडचा राज्यकारभार त्याच्या हाती होता. या काळात न्यायालयात सुधारणा, वृत्तपत्रावरील बंदी उठवली, इ. गोष्टी त्यांनी केल्या खऱ्या, पण ते स्वत: हुकूमशहासारखे वागू लागले. पार्लमेंट ही सभा रद्द केली. स्वत:ची नेमणूक सरसेनापती अशी करून साऱ्या प्रांतावर मेजर जनरल नेमून इंग्लंडमध्ये एक प्रकारे लष्करशाहीच निर्माण केली. परिणामी, त्यांच्याविषयी असंतोष निर्माण झाला. त्यांना ठार मारण्याचे कट त्यांनी जरी उलथून पाडले तरी यामुळे ते खचले आणि शेवटी चिंतेने ३ सप्टेंबर १६५८ रोजी त्यांचे निधन झाले. क्रॉमवेलच्या मृत्यूनंतर इंग्लंडच्या जनतेचे राजाविषयीचे प्रेम पुन्हा उफाळून आले. दुसऱ्या चार्ल्सला गादीवर बसवून क्रॉमवेलचे थडगे उखडून त्याची विटंबना केली. अगदी अलीकडे म्हणजे १९६०च्या सुमारास त्याच्या थडग्याचे दफन करण्यात आले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
हे सगळं कोण करतं?
युवराजनं एका कुंडीत माती, पालापाचोळा आणि तळाशी खापराचा तुकडा भरला. कुंडीत फुलाचं बी पेरलं. त्याला रोज पाणी घातलं. थोडं खत घातलं. काही दिवसांनी त्यातून मखमली अंकुर हळूहळू बाहेर डोकावू लागले. ऊन, हवा, पाणी यावर रोप वाढू लागलं. माती, खत यातून आपलं पोषणद्रव्य त्यानं मिळवलं. रोपाला स्वत:चा आकार येऊलागला. पानं फुटली. एक..दोन..तीन..चार..पाच अनेक पानांनी ते डवरून गेलं. छोटय़ा छोटय़ा फांद्या त्याला फुटल्या. त्या आपल्याबरोबर कोवळी इवली पानं घेऊनच. युवराज चकित होऊन हे बदल न्याहाळत होता. एके दिवशी लाजरी कळी एका छोटय़ाशा फांदीच्या टोकावर डोलू लागली. पाहता पाहता ती उमलली आणि टपोरं फूल झाली. युवराजची मांजर सारखी झोपू लागली. त्याच्या पायाशी अंग घासत बसेना. तो आला की लडिवाळपणे त्याच्याजवळ येऊन त्याच्याकडून लाड करून घेईना झाली. सदा आळसावलेली असायची. आई म्हणाली, ‘अरे, आता तिला जास्त दूध घालत जा प्यायला. तिला बाळं होणार आहेत आणि काही काळानं तिला हडकुळी, डोळे मिटलेली अगदी कमी केसाची, कशी तरीच दिसणारी बाळं झाली. युवराज फारच खट्टू झाला. असली कसली ही बाळं! बाळं आईच्या कुशीत झोपायची. तिचं दूध प्यायची. हळूहळू ती एकमेकांशी खेळू लागली. झोपलेल्या मांजरीच्या अंगावर चढून शेपटापासून डोक्यापर्यंत नाचू लागली आणि युवराजच्या एके दिवशी लक्षात आलं, की ती कुरूप पिल्लं सुंदर, गुबगुबीत, गोजिरवाणी मांजरं दिसायला लागली होती. सारखं सारखं त्यांना उचलून घेऊन कुरवाळावं असं वाटायला लावणारी. खेळण्याच्या मैदानावर खडकावरच्या वनस्पतींमध्ये पिवळंधमक सोनसळी चिमुकलं गवतफुल वाऱ्यावर डोलताना पाहूनही युवराजला फार आश्चर्य वाटलं. जिकडे पाहावं तिकडे त्याला नवलाई दिसायची. हे सगळं कसं घडतं, कोण करतं? युवराजला प्रश्न पडायचा. शाळेत सरांना विचारावं तर ते तासाला येऊन शिकवायचे. घंटा झाली की निघून जायचे. बाबा सतत कामात असायचे. आई, दादा, ताई सगळे आपापल्या व्यापात असायचे. युवराजनं आजीला विचारलं, ‘आजी हे सगळं कोण करतं गं?’ आजीनं युवराजला जवळ घेतलं. ती त्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवत म्हणाली, ‘अरे बाळा, कलाकार स्वत:च्या कल्पनाशक्तीतून शिल्प निर्माण करतो, माळी रोपांची काळजी घेतो, शेतकरी पिकं लावण्यासाठी जमीन तयार करतो, पिकांची देखभाल करतो, तसं जगात निर्मिती करण्याचं, नवं जन्माला घालून मोठं करण्याचं, त्याला रंग, रूप, आकार, गंध देण्याचं, सजवण्याचं, झगमगवण्याचं काम ‘ईश्वर’ करतो.’ युवराजनं कुतूहलानं विचारलं, ‘‘तो कुठे असतो आजी?’’ आजी म्हणाली, ‘तो आपल्या हृदयात असतो, सगळय़ा निसर्गात असतो.’’
ज्या ईश्वराने सारी सृष्टी निर्माण केली, आपल्याला जीवन दिलं, जो आपल्या सगळय़ांची काळजी घेतो, त्याच्याबद्दल कृतज्ञ राहून त्याची सदैव आठवण ठेवायला हवी.
आजचा संकल्प- मी ईश्वराचे नित्य स्मरण करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com