Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रमोद अग्रवालची शरणागती
२ मे पर्यंत पोलीस कोठडी
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

अडीच वर्षांत दुप्पट रकमेचे आमिष दाखवून हजारो नागरिकांची कोटय़वधी रुपयाने

 

फसवणूक करणाऱ्या प्रमोद अग्रवालने आज अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागात येऊन शरणागती पत्करली. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून त्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन अग्रवालला येत्या २ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
प्रमोद अग्रवालविरुद्ध ४५ नागरिकांनी विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणी पोलीस कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच प्रमोद अग्रवालने आज सकाळी ८ वाजता पोलिसांपुढे शरणागती पत्करली. यानंतर पोलिसांनी त्याचे जबाब नोंदवले व गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी त्याला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी जी.आर. ढेपे यांच्या न्यायालयात हजर केले. प्रमोद अग्रवाल यांनी विविध संस्था उघडून नागरिकांची कोटय़वधी रुपयांनी फसवणूक केली आहे. हा पैसा नेमका कोठे गुंतवला याची चौकशी करायची असल्याने त्याला ५ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील मेघा महाजन यांनी न्यायालयाला केली.
आरोपीचे वकील लुबेश मेश्राम आणि मुकुंद मुरारका यांनी मात्र या मागणीला विरोध केला. आरोपीने कुठलीही फसवणूक केली नाही. प्राप्तीकर विभागाने अग्रवाल यांच्या कार्यालयात छापे टाकून जमिनीच्या व्यवहाराचे ५०० विक्रीपत्र जप्त केले. त्यामुळे गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात अडचण येत आहे. आरोपीला २७ एप्रिलपर्यंतच पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रमोद अग्रवाल याला २ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
गुंतवणूकदारांची रक्कम सुरक्षित आहे. त्यांनी ठेव म्हणून ठेवलेल्या पैशांतून मी शेती किंवा भूखंड खरेदी केले आहेत. परंतु प्राप्तीकर विभागाने ५०० जमिनींचे विक्रीपत्र ताब्यात घेतले आहे.
हे विक्रीपत्र परत मिळताच गुंतवणूकदारांना त्यांचे विक्रीपत्र परत करण्यात येईल, असे प्रमोद अग्रवालने न्यायालयातून बाहेर येत असताना पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्या गुंतवणूकदारांच्या भूखंडाची विक्री झाली नाही, ते नाराज आहेत. त्यांनाही त्यांच्या भूखंडाची विक्री करून दिली जाईल, असेही अग्रवाल म्हणाला.
न्यायालयात हजर करण्यापूर्वी प्रमोद अग्रवालला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेले होते. तेथे त्याची तपासणी करण्यात आली असता त्याचा रक्तदाब वाढला असल्याचे डॉक्टर म्हणाले, असे पोलीस निरीक्षक कुद्रे यांनी सांगितले.