Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शहरात पाणी पेटले
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

नगरसेवकाची चालकांना मारहाण
टँकर चालकांच्या संपामुळे
पाणी टंचाईवरून महापालिकेतील विरोधी पक्षासह सत्तापक्षाचे नगरसेवकही आक्रमक झाले

 

आहेत. एका नगरसेवकाने टँकर चालकाला मारहाण केली तर, दुसऱ्या एका घटनेत दोन नगरसेवकांनी कार्यकारी अभियंत्याला काळे फासण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांची पाण्यासाठी पायपीट
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी
शहरात आधीच पाण्याचा ठणठणाट असताना वंजारी नगरात एका नगरसेवकाने टँकर चालकाला मारहाण केल्याने हनुमाननगर झोनमधील १८ टँकर चालकांनी आज संप पुकारल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली.
सागूंनही वस्तीमध्ये पाण्याचा टँकर न आल्यामुळे नगरसेवक किशोर गजभिये यांनी दोन टँकर चालकांना मारहाण केली. याच्या निषेधार्थ टँकर चालकांनी जोपर्यंत नगरसेवक गजभिये माफी मागत नाही, तो पर्यंत हनुमाननगर झोनमध्ये टँकर नेणार नाही, असा इशारा दिला. आज वस्तीमध्ये एकही पाण्याचा टँकर न आल्याने वंजारी नगरासह १२ प्रभागातील लोकांना पाण्यासाठी भटकावे लागले. दक्षिण नागपुरातील काही वस्त्यांमध्ये पहाटे फक्त दोन तास नळ येतो. वंजारी नगर पाण्याच्या टाकीतून १२ वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो.
याबाबत किशोर गजभिये यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वस्तीमध्ये टँकर येत नसल्याने टँकर चालक प्रमोद मानकर याच्याशी चर्चा केली. टँकर चालकाला मारहाण केली नाही त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही.
टँकर चालक प्रमोद मानकरचे म्हणणे आहे की, किशोर गजभिये यांना त्यांच्या भागात चार ते पाच टँकर हवे होते पण, ते शक्य नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी मारहाण करून शर्ट फाडला. त्यानंतर सर्व टँकर चालकांना याची माहिती देऊन अजनी पोलीस ठाण्यात गजभिये यांच्या विरोधात तक्रार केली. यावेळी ठाण्यासमोर टँकर चालकांनी गजभिये यांच्याविरोधात निदर्शने केली.