Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गिरीश गांधी यांचे पाणी बचतीचे आवाहन
हॉटेल व्यावसायिकांना पाठवले पत्र
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

देशातील एक-तृतीयांश जनतेला पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागपुरातही

 

जलसंकट भेडसावू लागले आहे. या भीषण स्थितीवर मात करण्यासाठी वनराई या संस्थेने पुढाकार घेऊन पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन त्याचा अपव्यय टाळणे आणि त्याची बचत करण्याचे आवाहन वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी हॉटेल्स व्यावसायिकांना केले आहे. यासाठी उपाययोजना सुचवणारे पत्रही त्यांनी शहरातील हॉटेल्सना पाठवले आहे.
हॉटेल व्यवसायातील स्वागताचे काही संकेत बदलणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या टेबलवरील ग्लास रिकामा राहू नये म्हणून त्यात पाणी भरलेच पाहिजे हा संकेत बदलणे महत्त्वाचे आहे, याकडे लक्ष वेधून, ग्राहकांना विचारल्यानंतरच ग्लासमध्ये पाणी भरण्याची सूचना वेटरला देण्यात यावी, असेही गिरीश गांधी यांनी सुचवले आहे.
काटकसरीने पाणी वापरण्याबाबत मेन्यू कार्ड, बेसीन, बाथरुममध्ये घोषवाक्य असावेत. याशिवाय हात धुण्याच्या जागी घोषवाक्यांची स्टिकर्स लावावी, यामुळे ग्राहक आणि कामगारांमध्ये जागरुकता येईल. पाण्याचा ग्लास पूर्ण भरण्याऐवजी अर्धा भरावा, भांडे धुताना नळ सुरू ठेवू नये, शक्यतो मोठय़ा पात्रांमध्ये पाणी घेऊन भांडी विसळावी व दुसऱ्या पात्रामधून स्वच्छ धुवावी, हॉटेलमधील कामगारांना पाण्याच्या बचतीची माहिती द्यावी आणि तसे वागण्यास प्रेरित करावे, वाहणारे नळ व गळती असणारे पाईप तात्काळ दुरुस्त करावे, हॉटेलच्या खोलीत स्नानगृहात पाणी काटकसरीने वापरण्यासाठी ठळकपणे घोषवाक्य लिहावे आणि हॉटेल्समध्ये वापरण्यात आलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून उद्यानात वापरावे, असेही गिरीश गांधी यांनी सुचवले आहे. पावसाच्या पाण्याचे नियोजन करून ते वापरण्यासाठी यंत्रणा तयार करावी, बगिच्यात कमी पाणी लागेल, अशी झाडे लावावी आणि हॉटेलच्या बिल बुकवर जल संवर्धनाचे घोषवाक्य छापून घ्यावे, यामुळे जागरुकता निर्माण होईल, असा विश्वासही गिरीश गांधी यांनी व्यक्त केला.
‘पाण्याचा वापर कमी करावा’, ‘शक्य असेल तेथे पाण्याचा पुनर्वापर करा’, ‘पानी का नियोजन भावी पिढी का जीवन’, ‘पाण्याचे प्रदुषण टाळा’, ‘पाणी आहे सोन्यावानी ।। जपायचे सर्वानी’, ‘दुष्काळाची टाळण्या आपत्ती।। काटकसरीने वापरा संपत्ती’, ‘वसुंधरेवर तीन भाग पाणी।। नियोजना अभावी अपुरी कहाणी’ ‘करुया पाणी व्यवस्थापन राष्ट्रीय संपत्तीचे होईल रक्षण’ आणि ‘पाण्याचे नियोजन भावी पिढय़ांचे संरक्षण’ आदी घोषवाक्य बिलबुक, भिंतींवर ठळकपणे लिहावे, असेही गांधी यांनी म्हटले आहे.