Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

थंडा थंडा ज्यूस.. मागणी वाढली
नागपूर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

वाढत्या उकाडय़ातही शरीराचा उत्साह टिकवण्यासाठी फळांचा रस पिणाऱ्यांची संख्या वाढू

 

लागली आहे. उन्हाच्या काहिलीत फळांचा गारेगार रस सर्वोत्तम समजला जात असल्याने ‘ज्यूस सेंटर’ आणि उपाहारगृहांमध्ये फळांचा रस भरपूर प्रमाणात विकला जात आहे.
अंजीर, आंबा, खरबूज, कलिंगड, अननस, डाळिंब, गुलाब, संत्रा, सफरचंद, मोसंबी, सीताफळ, रामफळाचा रस तर ‘मिक्स ज्यूस’मध्ये सफरचंद, चिकू, अननस, मिल्कशेक, चॉकलेट शेकला अधिक मागणी आहे. दूध, साखर, बर्फ आणि ज्यूस एकत्र यांचे मिश्रण असते. वाढत्या तापमानामुळे लोक दिवसा घराबाहेर पडणे टाळत असून सायंकाळी ६ वाजल्यानंतर नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे ६ वाजल्यानंतरच ज्यूस सेंटर व उपहारगृहांमध्ये गर्दी दिसून येते. सदरमधील जयेश ज्युस सेंटर प्रमोद सैनिस यांनी सांगितले, आमच्याकडे तब्बल १५ प्रकारचे ज्यूस उपलब्ध आहेत. मिक्स ज्यूसची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ग्लासाला १० रुपये अशी फळांच्या रसाची किंमत आहे. हा दर सर्वसामान्य ग्राहकांनाही परवडणारा असल्यामुळे लोकांच्या उडय़ा पडतात.
अंजीर, आंबा, कलिंगड, खरबूज, अननस, डाळिंब, संत्रा, आदी फळे मुंबई, पुणे किंवा आंध्रातून आणली जातात. फळांचा रस आरोग्यासाठी अधिक पोषक असून उन्हाळ्यात रसरशीत फळे खाणे गरजेचे असते. त्यामुळे मनुष्याच्या शरीरातील पाणी भरून निघण्यास मदत होते. ज्यांना फळ विकत घेणे परवडणारे नाही, त्यांनी ज्यूस सेंटर व हॉटेलचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे. कलिंगडाची डिश पाच रुपयांत मिळत असल्याने लोक चवीने खातात, अशी माहिती गांधी चौक येथील रिझाम फ्रूटचे मालक शेख पाशा यांनी दिली.
शहरातील विविध भागात ‘मँगो ज्यूस सेंटर’ आहेत. मेडिकल चौक, सदर, महाल ,इतवारी , सातीबर्डी गोकुळपेठ या भागात मँगो ज्युसची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असते. एका ज्यूस सेंटरमधून दिवसागणिक ३०० किलोच्या वर आंबे लागतात. मुख्य बस स्थानकानजीक मँगो ज्यूस सेंटर उघडण्यात आले आहे. टोकन पद्धतीने पाच रुपयात ग्राहकांना अवघ्या दोन मिनिटात मँगो ज्यूस उपलब्ध करून दिला जातो.