Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ऐन लग्नसराईत धान्य महागले
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

महागाई निर्देशांकात लक्षणीय घट झाली असताना मागणीच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंचा

 

बाजारपेठेत पुरवठा होत नसल्याने किमती अचानक वाढल्या आहेत. यंदा तांदूळ, डाळ आणि गव्हाच्या उत्पादनात घट झाली असून ऐन लग्नसराईच्या दिवसात धान्याच्या किमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशावर चांगलाच बोजा पडला आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपर्यंत डाळी वगळता सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. महागाई निर्देशाकांतही घट झाली होती. मात्र, दुसऱ्या आठवडय़ात भाववाढीस सुरूवात झाली. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून बाजारात धान्य येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात मोठय़ा प्रमाणात खरेदी होत असल्याने व्यापारीही मोठय़ा प्रमाणात मालाची मागणी करतात. उन्हाळ्यात वर्षभराचे धान्य खरेदी करून ठेवण्याची प्रथा असल्याने या दिवसात मोठय़ा प्रमाणात धान्य खरेदी सुरू असते. यंदा व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीच्या तुलनेत आवक होत नसल्याने व्यापाऱ्यांचीही गोची झाली आहे. त्यातच झालेली भाववाढ यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांचे गणित बिघडले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात महागाई निर्देशांक ०.१८ टक्के इतका होता. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत घट होण्याची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली आहे.
सुरुवातीला गहू, त्यानंतर डाळ आणि गेल्या आठवडय़ापर्यंत साखरेच्या किमती चांगल्याच वाढल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ चांगलीच बसली आहे. त्यातच सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने यात आणखीच भर पडली आहे. डाळीच्या एकूणच उत्पादन कमी झाल्याने तूर डाळीसारख्या दैनंदिन वापरातील डाळीचे भाव ५ हजार रुपयांपर्यंत गेले. याशिवाय इतरही डाळींच्या किमतीत वाढ झाली आहे.
यंदा डाळीचे पीक चांगले झाले असले तरी सतत डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. तूर डाळ काही दिवसांपूर्वी ठोक बाजारात ४९०० ते ५२०० रुपये क्विंटलने उपलब्ध होती. त्यात काही प्रमाणात घट झाली असली, तरी बाजारात मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने भाव ५ हजारापर्यंत स्थिर राहण्याची शक्यता आहे. भाववाढीचा फायदा किरकोळ विक्रेत्यांना होत असून त्यामुळे सध्या तूर डाळीची विक्री ४८ ते ५० रुपये किलोने करण्यात येत आहे. तूर डाळीच्या किंमतीत इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याचे कारण म्हणजे राज्य सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ६ हजार टन डाळीच्या निविदा मागवल्या आहेत. बाजारात डाळीचा साठा उपलब्ध नसल्याने तूर डाळीच्या किमतीत वाढ झाल्याचे बाजारातून सांगण्यात येत आहे. डाळीबरोबरच तांदळाच्या किंमतीत १५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या तांदूळ १३५० ते १४०० रुपये प्रति क्विंटलने बाजारात उपलब्ध आहे. एचएमटी तांदूळ सध्या बाजारात २५०० रुपये प्रति क्विंटल तर चिन्नोर २६०० ते ३००० रुपये प्रति क्विंटलने उपलब्ध आहे. डाळ, तांदूळ या दैनंदिन खाद्यांनाबरोबरच साखरेच्या भावातही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. ऐन उन्हाळ्यात साखरेचे भाव कधी नव्हे इतके वाढले. साखरेच्या भाव २६०० रुपये क्विंटलपर्यंत गेल्यावर केंद्र सरकारने बाजारात साखरेचा नवा कोटा जाहीर केला. त्यामुळे २८ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले भाव काही प्रमाणात कमी झाले असले तरी आवाक्यात आलेले नाहीत.