Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गुंतवणुकीचा नेमका आकडा किती?
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

महादेव लॅन्ड डेव्हलपर्सचा मालक प्रमोद अग्रवाल आज पोलिसांना शरण आला असला तरी,

 

त्याच्याकडील गुंतवणुकीच्या आकडय़ाबाबत मात्र, अजूनही संभ्रम आहे. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारावर हा आकडा तीनशे कोटींच्या घरात आहे, मात्र गुंतवणुकदारांची संख्या लक्षात घेतली तर, तो यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सुरुवातीला कळमना अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आणि त्यानंतर महादेव लॅन्ड डेव्हलपर्सच्या माध्यामतून नागपूरच नव्हे तर, नागपूरबाहेरच्या सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात अग्रवालकडे ठेवी जमा केल्या होत्या. वर्तमानपत्रात जाहिराती देऊन अग्रवाल ठेवीदारांची रक्कम कशा पद्धतीने पटीत वाढत जाणार याचे चित्र रंगवित असल्याने त्याला बळी पडून अनेकांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी अग्रवालच्या हवाली केली होती. त्यामुळे ही रक्कम ७०० ते ८०० कोटींच्या घरात असावी, असा अंदाज गुंतवणूकदारांचा आहे. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणुकदारांचा आकडा दोन लाखाच्या घरात असून १० हजार रुपयांपासून तर दोन कोटींपर्यंत नागरिकांनी ठेवी जमा केल्या आहेत. यात छोटय़ा व्यावसायिंकापासून तर, मोठय़ा उद्योगपती आणि अधिकाऱ्यांच्याही मोठय़ा रक्कमांचा समावेश आहे. मोठय़ा गुंतवणूकदारांची नोंद फक्त अग्रवालकडेच आहे. त्यामुळे ठेवींचा आकडा फूगू शकतो. मात्र आज सकाळी जेंव्हा अग्रवाल पोलिसांकडे शरण आला, तेव्हा त्याने सरासरी ३०० कोटींचीच गुंतवणूक झाल्याची माहिती दिल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी सांगितले. कळमना अर्बन सोसायटी आणि महादेव डेव्हलपर्सची सर्व कागदपत्र आयकर खात्याने ताब्यात घेतली असल्याने ती तपासल्यवरच गुतंवणुकीचा खरा आकडा बाहेर येईल, असे ते म्हणाले. कागदपत्रे तपासल्यावरच काय ते कळेल, असे सांगून अनुपकुमार सिंह यांनी चौकशीला वेळ लागणार असल्याचे संकेत दिले.
अग्रवाल दोन आठवडय़ांपासून बेपत्ता असला तरी, त्यांच्या गणेशपेठ येथील निवासस्थानी आणि गांधीबागेतील कार्यालयात ठेवी परत घेण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी होतच होती. आज गुन्हे शाखेतही अग्रवालला पाहण्यासाठी गर्दी झाली. अग्रवालच्या विरोधात गुंतवणूकदारांमध्ये असंतोष वाढत चालल्याने पोलिसांवर दबाव वाढला होता. पोलीस त्याला पाठिशी घालत असल्याची टीका होत होती, या पाश्र्वभूमीवर अग्रवालचे त्याच्या वकिलाला घेऊन शरण येणे नाटय़मय आणि चर्चेचा विषय ठरले आहे.