Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

छायाचित्रकार व कॅमेरामनला पोलिसांची धक्काबुक्की
निषेध नोंदवून पोलीस आयुक्तांकडे तक्रार
नागपूर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून शहरात सर्वाच्या चर्चेचा विषय ठरलेल्या प्रमोद अग्रवालने आज गुन्हे

 

शाखेच्या कार्यालयात आत्मसमर्पण केल्यानंतर त्यासंबंधीची माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि कॅमेरामनला गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली. पोलिसांच्या या वर्तवणुकीबद्दल छायाचित्रकारांनी निषेध व्यक्त केला व झालेल्या प्रकाराबद्दल पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास महादेव लॅन्ड डेव्हलपर्स आणि कळमना क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचा सर्वेसर्वा प्रमोद अग्रवाल याने आत्मसमर्पण केल्याचे कळताच सर्वच वृत्तपत्राचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार तसेच वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आले. यावेळी अग्रवाल यांची विचारपूस सुरू असल्याने वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना सुमारे तीन ते चार तास बाहेरच ताटकळत राहावे लागले. तीन वाजताच्या सुमारास अग्रवालला न्यायालयात नेण्यासाठी बाहेर आणले असता छायाचित्रकारांनी छायाचित्र काढण्यास सुरुवात केली, तर त्यांना बाजू होण्यास सांगितले. पोलीस इतक्यावरच थांबले नाही, तर छायाचित्रकार व कॅमेरामन यांना धक्काबुक्की करून लिफ्टने खाली आणले. यावेळी त्याठिकाणीही उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांनी गाडीत बसताना छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्का देऊन बाजूला केले. यात दोन वृत्तपत्राचे छायाचित्रकार आणि कॅमेरामन खाली पडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या या प्रकाराबद्दल छायाचित्रकारांनी पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित, सह-पोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले यांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.