Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

हस्तकांना काळे फासण्याचा बेत फसला!
नागपूर, २४ एप्रिल/ प्रतिनिधी

नंदनवन झोपडपट्टी आणि हसनबाग परिसरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे

 

नगरसेवक मजिद शोला आणि रुपेश मेश्राम यांनी कार्यकारी अभियंता शशिकांत हस्तक यांना आज काळे फासण्याच्या उद्देशाने धरमपेठ कार्यालय गाठले. परंतु, हस्तक यांच्या सहाय्यकाने त्यांना वेळीच माहिती दिल्याने ते मागच्या दाराने पसार झाले.
गेल्या आठ दिवसांपासून नंदनवन झोपटपट्टी आणि हसनबाग परिसरात पाण्याची टंचाई आहे. या भागात नंदनवन, म्हाळगीनगर आणि लकडगंज येथील पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होतो. परंतु, अधिकारी या टाक्या विशिष्ट पातळीपर्यंत भरत नसल्याने नळाला कमी पाणी येते. याविषयी परिसरातील नागरिक संबंधित नगरसेवकांकडे वारंवार तक्रार केल्या मात्र, पाणीपुरवठय़ात कोणतीही सुधारणा झाली नाही. शेवटी आज या नगरसेवकांनी महिला-पुरुषांचा मोर्चा धरमपेठेतील जलप्रदाय विभागाच्या मुख्यालयात नेला. सोबत काळ्या रंगाचे डबे होते. कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचताच शशिकांत हस्तक यांना त्यांच्या सहायकांनी याविषयी सांगितले. लागलीच हस्तक मागच्या दाराने परिसरातून निघून गेले. घोषणा दिल्यानंतर तेथूनच नगरसेवक मजिद शोला यांनी हस्तक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. हस्तक यांनी २४ तासात ही समस्या सोडवण्यात येईल, असे सांगितले.