Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विभागीय चौकशी सुरू झाल्यामुळे
पोलीस अधीक्षकाविरुद्धची याचिका निकाली
यवतमाळ जिल्ह्य़ातील पोलीस भरतीत गैरप्रकार
नागपूर, २४ एप्रिल/ प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्य़ातील पोलीस भरतीच्या प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारासाठी जबाबदार असलेले

 

तत्कालीन पोलीस अधीक्षक अब्दुर रहमान यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने दिल्यामुळे या संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिमत: निकाली काढली आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ात पोलीस शिपायांच्या भरतीची प्रक्रिया ऑगस्ट २००७मध्ये झाली होती. या परीक्षेत मराठीत निबंध लिहिणे आवश्यक असताना काही विशिष्ट विद्यार्थ्यांना उर्दू भाषेत निबंध लिहिण्याची परवानगी देण्यात आली. महिलांसाठी ३० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या असता या जागांवर महिला उमेदवार घेण्यात आले नाहीत, या व इतर तक्रारी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी केली होती. या पोलीस भरतीबाबतचा संपूर्ण रेकॉर्ड मागवून न्यायालयाने त्याची पाहणी केली होती.
या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांविरुद्ध काय कारवाई करणार, याबाबत शपथपत्र सादर करण्याचा आदेश देऊन न्यायालयाने गेल्या जानेवारी महिन्यात ही याचिका निकाली काढली होती. परंतु प्रत्यक्ष कारवाई काय केली जाते यावर लक्ष ठेवण्यासाठी याचिका आज पुन्हा सुनावणीसाठी ठेवली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी मार्च महिन्यात शपथपत्र दाखल केले. अब्दुर रहमान यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस आपण सरकारला केल्याचे त्यांनी या शपथपत्रात म्हटले होते. त्यानंतर गेल्या २७ मार्चला सरकारनेही शपथपत्र दाखल केले आणि त्यात अब्दुर रहमान यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
न्यायालयाच्या अंतरिम निर्देशांचे पालन झाले असल्यामुळे न्या. सिन्हा व न्या. भंगाळे यांच्या खंडपीठाने ही याचिका अंतिमत: निकालात काढली. अर्जदारातर्फे अ‍ॅड. रणजित भुईभार यांनी काम पाहिले.