Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दोन अपघातात दोघे ठार
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

ग्रामीणमधील सावनेर आणि देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
पिपळा (खाण) येथील दीपक भामराज कोल्हे (२०) हा गुरुवारी सायंकाळी ६.४० वाजता

 

सायकलने पाटणसावंगीकडे जात असता नागपूरकडून पांढुर्णाकडे जाणाऱ्या मिनी बसने (क्र.एमएच-३० ई-१८६) त्याला धडक दिली. या धडकेत दीपक कोल्हे गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून मिनी बसचालक गणपती महादेव भांडे (४५) रा. पांढुर्णा याला अटक केली.
दुसरा अपघात देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटी शिवारात घडला. गुरुवारी सकाळी १०.४० वाजता एमएच३१ जेड-३६५२ क्रमांकाची जीप हिवराबाजारकडून रामटेककडे जात असताना घोटी शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. त्यात जीप चालक संदीप मंचम मांढरे (२३, रा.हिवरा बाजार), जीपमधील दीनदयाल पुसाराम आत्राम (रा. हिवराबाजार), प्रमीला सूर्यभान बागडे, सूर्यभान डोमा बागडे, अभिषेक सूर्यभान बागडे (सर्व रा. पंचाळा), शुभम माणिकराव शिवरकर, शर्मिला माणिकराव शिवरकर (दोघेही रा. तुमसर, जि. भंडारा) हे सात जण गंभीर जखमी झाले. या सर्वाना उपचारासाठी रामटेक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना जीपचालक संदीप मांढरे याचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.