Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मोटारसायकल चोरणारे दोघे अटकेत; ८० हजारांची ४ वाहने जप्त
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

गणेशपेठ पोलिसांनी दोन मोटारसायकल चोरांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ८० हजार

 

रुपये किंमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या. यामधील एक चोरटा मध्यप्रदेशातील असून तो अट्टल गुन्हेगार आहे.
गणेशपेठ पोलीस २१ एप्रिलला सायंकाळी ६ ते रात्री ८ या दरम्यान नाकाबंदी मोहीम राबवत असता एक मोटारसायकलस्वार वेगात आला व पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोटारसायकलसह पकडले. कृष्णदास विधाता बोस (२३) असे त्याचे नाव असून तो मध्यप्रदेशातील फुवना, जि. रिवा येथील रहिवासी आहे. त्याच्याजवळील मोटारसायकल (क्र. एमएच ३१ बीएन २७७२) वीस दिवसांपूर्वी अशोक चौकातील वेल्डिंगच्या दुकानासमोरून चोरून नेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हिक्टर (क्र. एमएच ३१-४६५३) तसेच सीताबर्डी हद्दीतून (एमएच ३२ एफ ९६०२) या दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली त्याने दिली.
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ६० हजार रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या. आरोपी वाहन चोरी करणारा अट्टल गुन्हेगार आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या एस.एस. गाडेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद शिरभाते, हे.कॉ. जॉन सॅम्युअल, पो.कॉ. रामकृष्ण बडे, सुनील ठाकूर, रवी जामकर, प्रशांत पांडे, संजय केसरे यांनी केली.
गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पथक २१ एप्रिलला मोक्षधाम चौक येथे गस्त घालत असताना त्यांना एक मोटारसायकलस्वार संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. आनंद अरुणकुमार राज (२९) असे त्याचे नाव असून तो खापरखेडा, चानकापूर कॉलनी येथील रहिवासी आहे. त्याच्या मोटारसायकलवर दोन क्रमांक आढळून आले. याबाबत त्याची विचारपूस केली असता त्याने ही मोटारसायकल कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथून चोरी केल्याचे सांगितले. या मोटारसायकलचा खरा क्रमांक एमएच-४०-जी-४५१ हा आहे. आनंदला अटक करून त्याच्या ताब्यातील मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
आकस्मिक मृत्यू
झोपेच्या गोळ्या अधिक प्रमाणात सेवन केलेल्या एका इसमाचा मृत्यू झाला. रशीद अहमद अब्दुल अंसारी (३०) असे त्यांचे नाव असून तो एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस नगर येथील रहिवासी आहे.
२३ एप्रिलला दुपारी २ वाजतापूर्वी त्यांनी अधिक प्रमाणात झोपेच्या गोळ्या सेवन केल्याने त्यांची प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्याला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मरण पावल्याचे सांगितले. तो जहाजावर काम करत असून रजा घेऊन घरी आला होता. त्याला झोपेच्या गोळ्या सेवन करण्याची सवय होती. नगमा अब्दुल अजीज अंसारी (४०) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.
तंत्रनिकेतन शाखेचा विद्यार्थ्यांचा विहिरीत मृतदेह आढळला
रायसोनी कॉलेजमधील तंत्रनिकेतन शाखेचा तृतीय वर्षांला असलेल्या आनंद श्यामराव मुन (१९) याचा गुरुवारी रात्री ११.३० वाजता वडधामना येथील ग्रामपंचायतच्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. वडिलांच्या सूचनेवरून वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.
बालाजीनगरात पावणे दोन लाखाची घरफोडी
घरी कुणी नसल्याचे पाहून चोराने १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगरात घडली.
बालाजीनगरातील नामदेव लक्ष्मण मडावी (७४) हे कुटुंबीयांसह १९ ते २३ एप्रिलपर्यंत बाहेरगावी गेले होते. यादरम्यान चोराने घराच्या दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला व आलमारीत ठेवलेले रोख ३५ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. मडावी २३ एप्रिलला रात्री ८.३० वाजता घरी आले तेव्हा, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. लगेच त्यांनी कळमना पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.