Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

संविधान टिकवण्यासाठी जागरूक राहण्याची गरज -डॉ. क्षीरसागर
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

भारतीय संविधान हे सामाजिक, आर्थिक आणि नैतिक स्वातंत्र्य टिकवणारी सर्जनशील

 

व्यवस्था असून ते टिकवण्यासाठी प्रत्येक माणसाने जागरूक राहण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत, प्रसिद्ध विचारवंत डॉ. आर.के. क्षीरसागर यांनी येथे व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ते ‘आजच्या समस्या आणि भारतीय संविधान’ या विषयावर बोलत होते. भारतीय समाज रचनेत जाती व्यवस्था देशापुढील समस्येचे मुख्य कारण आहे. वेद, स्मृती, संहितेतून जातिव्यवस्थेची निर्मिती होते. त्यामध्ये प्रत्येकालाच एक दर्जा दिला आहे. जातीमुळे सुरक्षितता लाभते, असाही एक गैरसमज समाजात रूढ आहे. जाती व्यवस्थेचे समर्थन आणि धिक्कारही इतिहासकारांनी यापूर्वी केला आहे. गोळवलकर गुरुजींच्या मते, जाती व्यवस्थेमुळे समाज व्यवस्था एका सूत्रात बांधली गेली तर, महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणतात, पूर्वी माझे वर्णव्यवस्थेविषयी जे मत होते ते आज आहेच, असे नाही. साम्यवाद्यांनी केवळ वर्गव्यवस्थेकडेच लक्ष दिले. त्यांनी कधीही समस्येचे मूळ कारण असणारी जातीव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केला नाही.
काश्मिरला ३७० कलमानुसार मिळालेला विशेष दर्जा विषयी क्षीरसागर म्हणाले, काश्मिरला विशेष दर्जा दिला म्हणून देशाच्या निधर्मीपणाला तडा जातो, असे काहीजण म्हणतात मात्र, बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा मात्र, निधर्मीपणाला धक्काही लागला नाही, याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
भारत- पाकिस्तान संबंध, भारत- चीन संबंध, नक्षलवाद, प्रशासनातील गैरव्यवहार, दहशतवाद अशा अनेक समस्या देशापुढे आहेत. त्याहीपेक्षा देशात राष्ट्रीय एकात्मतेचा अभाव, असुरक्षितता, अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीयांच्या समस्या, अल्पसंख्याकांच्या समस्या आणि पक्षांतर करण्यासारख्या समस्याही मोठय़ा प्रमाणात आहेत. केवळ पक्षांतर करण्यावरून या देशात अनेकदा राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले, याकडे डॉ. क्षीरसागर यांनी अंगुलीनिर्देश केला. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संविधानात महत्त्वपूर्ण प्रावधान आहेत. गरज आहे त्यांना प्रामाणिकपणे अमलात आणण्याची. एकूणच सामाजिक, आर्थिक आणि नैतिक स्वातंत्र्य टिकवणारे संविधान ही सर्जनशील अशी व्यवस्था आहे. त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न काही धर्माध शक्ती करीत आहेत. त्यासाठी सामान्य माणसाने डोळ्यात तेल घालून जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत मनोहर होते. त्यांचेही यावेळी भाषण झाले. व्यासपीठावर कुलसचिव सुभाष बेलसरे होते. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.