Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जुन्या वैमन्यस्यावरून खून; दोघांना अटक
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

जुन्या वैमन्यस्यावरून तिघांनी मिळून एका इसमाचा खून केल्याची घटना केळवद पोलीस

 

ठाण्याच्या हद्दीतील नांदोरी येथे घडली. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून फरार असलेल्या एका आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
बंडू कमलदास घोरमारे (३०), राजू मुरलीधर जोगी (२०) अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून यातील मुख्य आरोपी देवेंद्र हेमराज डाखरे (३५) हा फरार आहे. प्रदीप सुमितराव सिन्हा (४३) असे मरण पावलेल्याचे नाव आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये देवेंद्र हेमराज डाखोरे याने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. या मुलीची तक्रार देण्यासाठी प्रदीप सिन्हा, त्यांची पत्नी छबीकांता, पीडित मुलीचे आई-वडील हे पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हापासून देवेंद्र हा सिन्हा यांचा राग करत होता व संधीची वाटच बघत होता.
२० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता देवेंद्र हा सिन्हा यांच्या घरी गेला व त्यांना गावाच्या बाहेर घेऊन गेला. तेथे आरोपी देवेंद्रचे साथीदार बंडू घोरमारे व राजू जोगी हजर होते. त्यांनी सिन्हा यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूचा प्रहार केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या सिन्हा यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी केळवद पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.