Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जनसंपर्क अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण -मिगलानी
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

प्रत्येक क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी, कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्राच्या

 

विकासासाठी सर्वानी मिळून काम करणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या समृद्धीसाठी प्रसारमाध्यमे, जनसंपर्क अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन वेकोलिचे निर्देशक ओ.पी. मिगलानी यांनी केले.
राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त हॉटेल विट्स येथे ‘जनसंपर्क : लोकशाहीतील पाचवा स्तंभ’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर-अमरावती विभागाचे माहिती व जनसंपर्क संचालक भि.म. कौशल होते. जनसंपर्क हे जबाबदारीचे काम आहे. जनसंपर्क अधिकारी व कर्मचारी समाज आणि स्वयंसेवी संघटनांना जोडण्याचे काम करतात, असे मिगलानी म्हणाले. निवडणूक प्रक्रियेत जनसंपर्क अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मतदानाप्रती जनतेमधील निरुत्साहाबद्दल चिंता व्यक्त करून त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन घडवून आणले पाहिजे, असे कौशल म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन अतुल त्रिवेदी यांनी केले. एम.बी. दुरुगकर यांनी आभार मानले. याप्रसंगी पत्रकार जोसेफ राव, प्रकाश तागडे, आनंद भिसे, पीआरएसआयचे के.जी. मीसर, शरद चौधरी, ए.के. माथूर, वेकोलिच्या नागपूर क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक आर.सी. सनोडिया, जनसंपर्क प्रमुख आनंद सेनगुप्ता, सुरक्षा प्रमुख एम.एस. शाही, डॉ. एस. बाभूळकर, तसेच पीआरएसआयचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.