Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विदर्भाची स्वतंत्र रंगभूमी निर्माण व्हावी -चंद्रकांत कुलकर्णी
पराग घोंगे यांच्या
‘चक्रव्यूह’चे प्रकाशन
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

रंगभूमीच्या क्षेत्रातही विकेंद्रीकरणाची गरज असून विदर्भाची स्वतंत्र रंगभूमी निर्माण व्हावी,

 

अशी निकड प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्पष्ट केली. वाहिन्यांचा मारा परतवायचा असेल तर, अभिरूचीसंपन्नता वाढवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी रसिकांना केले. पराग घोंगे यांच्या ‘चक्रव्यूह’ या तीन नाटकांच्या संग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर लेखक पराग घोंगे आणि त्यांचे वडील श्रीधर घोंगे हे उपस्थित होते. चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी रंगभूमीच्या आजच्या अवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्राच्या रंगभूमीवर दिग्दर्शक, लेखकांची चवथी पिढी आज राज्य करीत असली तरी प्रेक्षकांची नवी पिढी मात्र तयार होताना दिसत नाही. चांगली मराठी नाटकं निवृत्तीच्या मार्गावर आहेत. वाहिन्यांवर चहूबाजूंनी मारा सुरू असून प्रेक्षक त्यातच गुंतला आहे. अशा स्थितीत सजग करणारं नाटक हे माध्यम सशक्त होण्याची गरज असून केवळ पुणे-मुंबईच नव्हे तर राज्याच्या विविध भागातही रंगभूमीच्या सशक्तीकरणाची गरज आहे. विदर्भाची स्वतंत्र रंगभूमी निर्माण करतानाच प्रेक्षकांची अभिरूचीसंपन्नता वाढवली पाहिजे, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. पराग घोंगे यांच्या प्रयत्नाचे कौतुक करतानाच त्यांनी अल्पाक्षरी व्हावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
तत्पूर्वी प्रशांत दळवी यांनीही चांगल्या संहिता येत नाहीत, अशा शब्दात रंगभूमीच्या ढासळत्या अवस्थेबद्दल खंत व्यक्त केली. सध्या लेखक, दिग्दर्शकांच्या चार पिढय़ा रंगभूमीवर आहेत पण, दोन चांगल्या नाटकांतले अंतर वाढत चालले आहे. नाटकं लिहिण्याची सवय तुटत चालल्याने निर्मितीचा ‘पॉज’ मोठा होत चालला आहे. नाटय़संकुलं कितीही उभी राहतील पण, एक नाटक उभं करणं कठीण होऊन बसलं आहे. मात्र यासाठी प्रेक्षकांचा बुद्धय़ांक कमी लेखता कामा नये तर त्यांची भावनिक गरज जोखण्याची गरज आहे, असे दळवी म्हणाले. प्रारंभी नागपुरात काही दिवस घालवलेल्या आठवणींनाही दळवी यांनी उजाळा दिला. मी औरंगाबादचा आणि लेखक नागपूरचे. ही दोन्ही शहरे रखरखित असली तरी रसरशीतही आहेत. मी स्वत:ला सांस्कृतिक नकाशावर तपासून पाहण्यासाठी मुंबईला गेलो पण, अनेक लोक गावातच राहिले व विझले. पण, घोंगे यांनी निराश न होता त्यांच्यातला रंगकर्मी जिवंत ठेवला. त्यांच्याकडून मोठय़ा उडीची अपेक्षा आहे, असे मनोगत व्यक्त करून दळवी यांनी घोंगे यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी अभंगाच्या स्वरात दोन मुलींच्या खांद्यावर पराग घोंगे यांच्या नाटय़संग्रहाची पालखी मंचावर आणण्यात आली. त्यानंतर प्रशांत दळवी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते घोंगे यांच्या लेखनाच्या कारकीर्दीतील सहकारी प्रकाश पात्रिकर, संजय काशिकर, प्रकाश लुंगे, प्रभाकर ठेंगडी, प्रमोद भुसारी, सीमा केतकर, श्याम आस्करकर, दीपलक्ष्मी भट, विनोद तुंबडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन रेणुका देशकर यांनी केले. प्रास्ताविक विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, समीक्षक डॉ. रवीन्द्र शोभणे, दिवाकर मोहनी, कवी प्रफुल्ल शिलेदार, मुकुंद काशिकर यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते.