Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दागिने पॉलीश करण्याच्या बहाण्याने फसवणूक
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

पॉलीश करण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक

 

केली. शिशीर चक्रवर्ती (२०) असे त्याचे नाव असून तो बडा बाजार, कोलकाता येथील रहिवासी आहे. त्याचा एक साथीदार फरार झाला असून गिट्टीखदान पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आज दुपारी १२ वाजता मनोहर विहार कॉलनी, हजारीपहाड येथील रीता कृष्णकांत पचौरी (२८) या एकटय़ाच घरी असता दोघे आरोपी त्यांच्याकडे आले व त्यांनी सोन्याच्या दागिन्यांना पॉलीश करत असल्याचे सांगितले. रीता पचौरी यांनी सोन्याचे एक मंगळसूत्र, दोन अंगठय़ा पॉलीश करण्यासाठी दिल्या. पॉलीश करण्यासाठी फेस येणारे पाणी तयार केले. त्यात ते दागीने टाकले. यानंतर आरोपींनी हे दागीने कुकरमध्ये गरम करण्यास सांगितले व लगेच निघून जाण्याची तयारी करू लागले. रिता पचौरी यांना संशय आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने परिसरातील नागरिक धाऊन आले. त्यांनी लगेच एका आरोपीला पकडले त्याच्याजवळ एक मंगळसूत्र आढळून आले. एक अंगठी कुकरमध्ये आढळून आली. तर सहा हजार रुपये किमतीची एक अंगठी दुसरा आरोपी घेऊन पसार होण्यास यशस्वी झाला. कुणीतरी ही माहिती पोलिसांना दिली. लगेच पोलीस घटनास्थळी आले व लोकांच्या ताब्यात असलेल्या आरोपीस अटक केली. फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.