Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

खैरलांजी हत्याकांड: आरोपींच्या शिक्षेविरुद्धची
याचिका दाखल करण्यात झालेला विलंब माफ
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

खैरलांजी हत्याकांडात जन्मठेप सुनावण्यात आलेल्या दोन आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात

 

यावी यासाठी याचिका दाखल करण्यात झालेला विलंब माफ करण्यात यावा, हा सी.बी.आय.ने केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला आहे.
भंडारा जिल्ह्य़ातील खैरलांजीत हे हत्याकांड झाले होते. सुरेखा भोतमांगे, तिची मुलगी प्रियंका, मुलगे सुधीर व रोशन या चौघांचा खून केल्याच्या आरोपाखाली भंडारा येथील सत्र न्यायालयाने सकरू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, रामू धांडे, जगदीश मंडलेकर व प्रभाकर मंडलेकर या सहाजणांना फाशीची शिक्षा सुनावली होती तर, गोपाल बिंजेवार व शिशुपाल धांडे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २४ सप्टेंबर २००८ला हा निकाल जाहीर करण्यात आला. या शिक्षेविरुद्ध सर्व आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले असून, न्यायालयाने ते यापूर्वीच दाखल करून घेतले आहे.
गोपाल बिंजेवार व शिशुपाल धांडे या दोघांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा कमी असल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.) केली आहे. तसेच आठही आरोपींना अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, पुरावा नष्ट करणे व कट रचणे या आरोपांतून दोषमुक्त ठरवणारा सत्र न्यायालयाचा आदेशही रद्दबातल ठरवावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तथापि, कायद्यातील तरतुदीनुसार ही याचिका त्यांनी निकालापासून ९० दिवसांच्या आत, म्हणजे २३ मार्चपर्यंत करायला हवी होती. परंतु या मुदतीत ती होऊ शकली नाही. ही याचिका दाखल करण्यात झालेला विलंब माफ करावा, असा अर्ज त्यांनी गेल्या आठवडय़ात न्यायालयात केला होता.
हा अर्ज न्या. ए.पी. लवांदे व न्या. पी.बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणीला आला. त्यावेळी सीबीआयने केलेल्या अर्जाला आरोपींच्या वकिलांनी विरोध करून हा अर्ज फेटाळण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने हा अर्ज मंजूर करून याचिकेची सुनावणी ५ मे पर्यंत पुढे ढकलली. सी.बी.आय.तर्फे एजाझ खान तर, आरोपींतर्फे नीरज खांदेवाले व सुदीप जयस्वाल या वकिलांनी काम पाहिले.