Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महसूल सेवेच्या ६१ व्या तुकडीचा सोमवारी दीक्षांत समारंभ
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

भारतीय महसूल सेवेतील ६१ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा दीक्षांत समारंभ राष्ट्रीय

 

प्रत्यक्ष कर अकादमीत सोमवारी, २७ एप्रिलला सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. अकादमीच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय महसूल खात्याचे सचिव प्रदीप भिडे अध्यक्षस्थानी राहतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष एस.एस.एन. मूर्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती एनएडीटीचे महासंचालक एन.पी. सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१६ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकारी सेवेत रुजू होतील. ६१ व्या तुकडीत १०१ प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत.
यातील ८ प्रशिक्षणार्थीना सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांमध्ये २ अधिकारी भूतान येथून आले आहेत.
गेल्या काही वर्षांत सहाय्यक आयकर आयुक्तांची अनेक पदे रिक्त असून मोठय़ा प्रमाणात अधिकाऱ्यांची गरज आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त असल्याबाबत विचारले असता सिंग म्हणाले की, गेल्या काही वर्षांत करदात्यांची संख्या वाढली आहे, मात्र, त्यामानाने अधिकाऱ्यांची संख्या अजूनही कमी आहे. १६ महिन्यांच्या प्रशिक्षणात भारतीय महसूल आणि कर पद्धती याबाबत सर्वप्रकारची माहिती देण्यात आली. यामध्ये आयकर कायदे, संगणकीय ज्ञान, शैक्षणिक आणि व्यावसायिक ज्ञान याबरोबर इतरही अनेक आवश्यक बाबींचे प्रशिक्षण आले आहे. यंदा सुधांशु शेखर या अधिकाऱ्याला सर्वाधिक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
एनएडीटीमध्ये दरवर्षी आफ्रिकन देश, श्रीलंका येथील महसूल अधिकारी प्रशिक्षणासाठी येत असतात. यंदाही ओमान आणि सिरीया येथील अधिकारी नागपुरात प्रशिक्षणासाठी येण्याची अपेक्षा असल्याचे सिंग म्हणाले. पत्रकार परिषदेला सहाय्यक महासंचालक तिरुमल कुमार, अरुण भटनागर उपस्थित होते.