Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

आवक घटल्याने मासळी कडाडली
उरण/वार्ताहर - जागतिक आर्थिक मंदी आणि मागील दोन महिन्यांपासून मासळी दुष्काळाचा सामना करणाऱ्या मच्छीमारांवर व्यवसाय बंद ठेवण्याची पाळी आली आहे. मासळीची आवकच या बंदमुळे घटल्याने बाजारपेठेत मासळीचे भाव कडाडले आहेत.
खोल समुद्रात मोठय़ा प्रमाणात मासळीचा दुष्काळ जाणवू लागला आहे. मासळीच मिळेनाशी झाल्याने खर्च केलेली रक्कमही मच्छीमारांच्या हाती लागत नसल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यातील पालघर, सातपाटी, अर्नाळा, डहाणू, वसई येथील हजारो मच्छीमारांनी दोन महिन्यांपासून मासेमारी व्यवसाय बंद ठेवणेच पसंत केल्याची माहिती करंगा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली. दुष्काळामुळे मासळी मिळण्याचे प्रमाण प्रचंड घटले आहेच, शिवाय जागतिक स्तरावरील आर्थिक मंदीमुळे निर्यात मासळीचे भाव निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहेत. यामुळे व्यवसाय करणे फारच अवघड झाले असल्याने हजारो मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत.

नकाराधिकारालाही अत्यल्प प्रतिसाद
पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उभे राहिलेले गजानन बाबर आणि आझम पानसरे हे प्रमुख उमेदवार उपरे वाटल्याने पनवेल विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे मानले जात आहे. पनवेलमध्ये सुमारे ४२ टक्के मतदान झाले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या नकाराधिकाराच्या आवाहनालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या क्षेत्रात केवळ १० मतदारांनी मत देण्यास नकार दिला, अशी माहिती पनवेलचे तहसीलदार आणि अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी संदीप माने यांनी दिली. ज्या ३६ लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार नाहीत तेथे कोणालाही पाठिंबा न देता तटस्थ राहा, असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. पनवेल आणि नवीन पनवेलमधील मनसेच्या नेत्यांनीही या घोषणेचा पुनरुच्चार केला होता. एवढेच नव्हे तर आमचे असंख्य कार्यकर्ते आणि मतदार नकाराधिकार बजावून पक्षाची ताकद दाखवून देतील, असा दावाही करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात केवळ १० उमेदवारांनी मतदानाच्या वेळी बोटाला शाई लावल्यानंतर उमेदवारांची नावे वाचून मत देण्यास नकार दिल्याचे समजते. या प्रकारामुळे मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेना अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारडय़ात मत टाकल्याची शक्यता आहे. तसे खरोखर घडले असेल तर तटस्थ राहण्याच्या पक्षादेशाला कार्यकर्त्यांनीच हरताळ फासला असे म्हणावे लागेल. मनसेचे अनेक कार्यकर्ते आणि नेते आमच्या संपर्कात असून ते आम्हाला भरघोस मते देतील, असा दावा काही प्रमुख राजकीय नेत्यांनी मतदानापूर्वीच केला होता. हा दावा मतदानानंतर खरा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दीपकमधील युनियनचा रौप्यमहोत्सव
पनवेल - तळोजा औद्योगिक वसाहतीतील ‘दीपक फर्टिलायझर्स’ या कारखान्यातील कामगार संघटनेचा रौप्य महोत्सव शनिवारी २५ एप्रिलला साजरा करण्यात येणार आहे. कॉम्रेड जी. आर. खानोलकर यांनी स्थापन केलेल्या या संघटनेला सध्या दादा सामंत यांचे नेतृत्व लाभत आहे. या संघटनेने आजवर वेतनवाढीचे आठ करार, कामगारांना चांगल्या सोयी-सुविधा मिळवून दिल्या आहेत. रौप्य महोत्सवानिमित्त शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात संघटनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.

उरण विधानसभा मतदारसंघात ५६.२८ मतदान
उरण/वार्ताहर - मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण विधानसभा मतदारसंघात ५६.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उरण विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले. सुमारे सव्वा दोन लाख मतदारांपैकी एक लाख २२ हजार ९५८ (५६.२८ टक्के) मतदारांनी मतदान केले. मतदारांनी दाखविलेल्या निरुत्साहामुळेच मतदान कमी झाले असल्याचा दावा केला जात आहे.