Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

श्रमपरिहारानंतर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा निकालाची
प्रतिनिधी / नाशिक

 

सलग महिनाभरापासून निवडणुकीच्या धामधुमीत गुंतलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला असला तरी आता सारेचजण मतदान यंत्रात दडलेल्या कौलाविषयी अंदाज बांधण्यात मग्न झाले आहेत. दुसरीकडे अगदी काल-परवापर्यंत कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे ओतप्रोत गजबजलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या कार्यालयांमध्ये शुक्रवारी दिवसभर शुकशुकाट पसरला होता. ‘श्रमपरिहार’ झाल्यानंतर सायंकाळी काही पदाधिकारी व कार्यकर्ते जमले खरे, पण त्यांच्यातही निकालाशिवाय दुसरी चर्चा रंगली नाही.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ते मतदान होईपर्यंत अविरत राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फौजफाटय़ाने ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विश्रांती घेतली. प्रमुख पक्षांचे तिकीट जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांचे खरे काम सुरू झाले होते. प्रचार रॅलीसाठी गर्दी जमविणे, जाहीर सभांचे नियोजन, परिचित मतदारांच्या गाठीभेटी, मतदारांच्या स्लीप वाटप, मतदान केंद्रांवर बुथची बांधणी, पक्ष प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थिती अशी एक नव्हे तर शेकडो कामांची जंत्री त्यांच्यामागे लागली होती. आपल्या उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळतानाच विरोधी उमेदवाराच्या गोटातील अंतर्गत घडामोडीची माहिती काढण्याचे कसब काही कार्यकर्त्यांनी दाखविले. त्याचा आधार घेऊन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपले डावपेच आणि रणनिती आखण्यास प्राधान्य दिल्याचे या कालावधीत दिसून आले. मतदान झाल्यानंतर आपल्या बुथवरील मतदानाची माहिती देवून रात्री उशिरा घरी परतलेल्या बहुतांश जणांनी दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत घरीच थांबणे पसंत केले. त्याचा परिणाम पक्ष कार्यालये ओस पडण्यावर झाला. प्रचार कार्यालयातही वेगळी स्थिती नव्हती.
प्रचारफे ऱ्या, मतदारांच्या गाठीभेटी घेवून थकलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जणू सुट्टी जाहीर केली असावी असे चित्र सर्वत्र दिसत होते. मतदानाच्या दिवशी सायंकाळी शहरात राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये झालेल्या वादावर पुढील दिशा निश्चित करण्याचे काम शुक्रवारी संबंधित पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमार्फत सुरू होते. थकलेल्या कार्यकर्त्यांनी मात्र आराम करण्याचे धोरण ठेवल्याने कार्यालयाबाहेर उभारलेले मंडप व होर्डिग्जही अनेक ठिकाणी ‘जैसे थे’ स्थितीत राहिले. दिवसभर विश्रांती केल्यानंतर सायंकाळी काही कार्यकर्त्यांची पावले पुन्हा पक्ष कार्यालयाकडे वळू लागली. आलेला प्रत्येकजण उत्सुकतेने निकालाचा अंदाज बांधत होता. विशिष्ट भागात अधिक मतदान झाले, त्याचा लाभ आपल्याच उमेदवाराला होणार असा दावा केला जात होता. विरोधकांची मतविभागणी, उमेदवारांचे मताधिक्य किती राहणार याविषयी अटकळी बांधून अंतिम विजय आपलाच होणार असल्यावर यावेळी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिक्कामोर्तब करून टाकले.
प्रचारासाठी घेतलेली मेहनत फळास येणार असल्याचा निष्कर्ष पुढे आल्याने थकलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटताना दिसत होती.