Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उत्तर महाराष्ट्रात मतदानाची अंतिम सरासरी ४८ पर्यंत
नंदुरबारमध्ये सर्वाधिक; तर धुळ्यात सर्वात कमी मतदान
प्रतिनिधी / नाशिक

 

गुरुवारच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झाली असून उत्तर महाराष्ट्रातील सहा मतदारसंघात सरासरी ४८ टक्के मतदान झाले. या सहा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये ५३ टक्के तर सर्वात कमी धुळे जिल्ह्य़ात ४० टक्के एवढे झाले. नाशिकमध्ये ४५.५३, दिंडोरी ४७.६४, जळगाव ४३, रावेर ५३ टक्के असे मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. एकूण मतदारांपैकी नाशिकमध्ये सहा लाख ५८ हजार ३८७ तर दिंडोरीमध्ये सहा लाख ८१ हजार ६२९ मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला.
उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये बोगस मतदानावरून निर्माण झालेला वाद, त्यानंतर झालेली दगडफेक व अन्य काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. नाशिक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान इगतपुरी विधानसभा मतदारसंघात ५३.५८ टक्के एवढे झाले तर नाशिक मध्य मतदारसंघात मतदानाची सर्वात कमी ३९.६४ टक्के एवढी सरासरी नोंदविली गेली. याशिवाय, सिन्नरमध्ये ४९.५८, नाशिक पूर्व ४१.८३, नाशिक पश्चिम ४०.१५, देवळाली ५२.३७ अशी अंतिममतदानाची नोंद झाली. नाशिक मतदारसंघात तीन लाख ७९ हजार ९०२ पुरूष तर दोन लाख ७८ हजार ४८५ महिला मतदानात सहभागी झाल्या होत्या.
दिंडोरीमध्ये सर्वाधिक मतदान दिंडोरी विधानसभा मतदारसंघात ६२.२२ टक्के तर सर्वात कमी नांदगाव विधानसभा मतदारसंघात ३७.८९ टक्के झाले. कळवण विधानसभा मतदारसंघात ५८.९५, चांदवड ४०.८४, येवला ४४.६५, निफाड ४४.२२ टक्के अशी मतदानाची नोंद झाली. दिंडोरीत तीन लाख ९२ हजार २८३ पुरुष तर दोन लाख ८९ हजार ३४६ महिला मतदारांचा समावेश होता. शहरी व ग्रामीण भागात काही मतदान केंद्रांवर महिला व पुरूषांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे दिसून आले.
शहरी व ग्रामीण भागात प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह दिसून आला. उत्तर महाराष्ट्रातल्या अन्य मतदारसंघांमध्येही थोडय़ा फार फरकाने अशीच स्थिती राहिल्याचे प्रशासनाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते.