Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्र वैद्यक परिषदेसाठी उद्या मतदान
प्रतिनिधी / नाशिक

 

राज्यातील एम.बी.बी.एस. आणि त्याहून उच्च शिक्षित वैद्यकांची नोंदणी करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेसाठी संपूर्ण राज्यातून ३९ उमेदवार रिंगणात असून रविवारी मतदान होत आहे. मात्र, केवळ जिल्हा मुख्यालयीच मतदान होणार असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी काम करणारी मंडली तसेच खासगी वैद्यक व्यवसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचा प्रयत्न केल्यास त्या त्या भागातील रूग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे दहा वर्षांनंतर निवडणूक होत आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यातून ७०,००० एवढे आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदवीधर मतदार असलेल्या या निवडणुकीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या (अकोला, औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, पुणे, सोलापूर, यवतमाळ) जिल्हयात शासकीय वैद्यक महाविद्यालयात मतदान होणार आहे. अमरावतीमध्ये संदर्भसेवा रूग्णालयात, भायखळा येथील ग्रँड मेडिकल कॉलेजमध्येही मतदानाची सोय आहे.
मुंबई उपनगराचे बांद्राच्या शासकीय वसाहतीत नागरी आरोग्य केंद्र येथे आणि उर्वरीत जिल्हांमध्ये जिल्हा शासकीय रूग्णालयात (सिव्हील) मतदान घेणार आहे. राज्यातील विविध तालुक्यापासून जिल्हामुख्यालयाच्या ठिकाण २५ किमी पासून दीडशे किमी पर्यंत आहे. एवढा प्रवास करून डॉक्टर मतदानासाठी आपला वेळ आणि प्रवास खर्च करून येणार का याची चिंता उमेदवारांना सतावत आहे.
महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडून एमबीबीएस झालेल्या वैद्यकांची नोंदणी करणे, त्यांचे दर पाच वर्षांने नूतनीकरण करणे, वैद्यक व्यवसायाच्या नितीनियमांचे पालन होते की नाही, रूग्णावर अन्याय झाल्यास त्याला संबधित डॉक्टरांविरुध्द दाद मागण्यासाठी महाराष्ट्र वैद्यक परिषद हे एक माध्यम असते. सदर ठिकाणी निवडून जाणारी व्यक्ती पारदर्शक, स्वच्छ चारित्र्याची आणि प्रामाणिक असावी. यासाठी राज्यातील वैद्यकांनी जास्तीजास्त संख्येने मतदान प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी केले आहे.
सदर निवडणूकीत वैद्यकांच्या एका संघटनेने राज्यातील सभासदांनी विश्वास न घेता काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी परस्पर आपली उमेदवारी जाहीर करून घेतल्याची चर्चा वैद्यकांमध्ये आहे. सदर निवडणुकीत नावाशी साधम्र्य असलेले एकूण चार उमेदवार उभे आहेत.
दहा वर्षांपूर्वी पोस्टाद्वारे मतदान झालेल्या निवडणुकीत राजकीय पक्षाचे काम करणाऱ्या आणि वैद्यकीय महाविद्यालयातील काही ज्येष्ठ डॉक्टरांनी आपल्या अधिकाराचा वापर करून कोऱ्या मतपत्रिका एकगठ्ठा गोळा करून मतदान करवून घेतल्याचा गैरमार्ग अवलंबला होता. यामुळे उच्च न्यायालयाने यंदा ही निवडणूक बूथ प्रमाणेच घ्यावी असे निर्देश दिले होते. मात्र, निवडणुकीचे मतदान तालुकास्तरावर तहसील कार्यालयात झाले असते तर वैद्यकांची सोय झाली असती, असे अनेक सदस्यांचे मत आहे.
सदर निवडणुकीमध्ये मतदार मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून तिचा क्रमांक ९८२३१- ३३५२३ असा असल्याचे महाराष्ट्र रिफॉर्मिस्ट पॅनलचे डॉ. पद्माकर पंडित यांनी कळविले आहे.