Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘आयपीएल’मध्ये अभिषेक राऊतची चमकदार कामगिरी!
प्रतिनिधी / नाशिक

 

कोलकाता नाइट रायडर्सच्या अचूक गोलंदाजीसमोर राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना एकेका धावेसाठी झगडावे लागत असतानाच मस्कारेन्हसही तंबूत परतल्याने संघाची अवस्था सहा बाद १२५. संघ दीडशेपर्यंतही मजल मारतो की नाही, या चिंतेने कर्णधार शेन वॉर्न ग्रासलेला. अशा कठीण समयी नाशिकचा अभिषेक राऊत मैदानात. सुरूवात काहीशी अडखळती. डावाच्या शेवटच्या षटकासाठी अनुरितसिंगच्या हातात चेंडू. अचूक टप्प्यावर चेंडू ठेवणाऱ्या सिंगचे पहिले तीनही चेंडू तडकाविण्यात अभिषेकला अपयश. नॉन स्ट्राइकर एंडकडून वॉर्नची अभिषेककडे धाव. वॉर्नकडून काही सूचना. स्टंपाबाहेरून जाणाऱ्या चवथ्या चेंडूवर अभिषेकचा जोरदार फटका. चेंडू कव्हरच्या डोक्यावरून थेट प्रेक्षकांमध्ये. क्रीझच्या बाहेर दोन पावले पुढे येत गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला फटकाही सीमेपलिकडे. लागोपाठच्या दोन षटकारांमुळे वॉर्नही आनंदित. शेवटच्या चेंडूवरही दोन धावा. अभिषेकच्या १३ चेंडूतील २१ धावांमुळे राजस्थान रॉयल्सच्या २० षटकांत १५०. सहा बाद १२५ वरून १५० पर्यंत मजल मारतानाच्या २५ पैकी २१ धावा एकटय़ा अभिषेकच्या..
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळणारा अभिषेक राऊत हा नाशिकचा एकमेव खेळाडू. या छोटय़ाशा खेळीतून त्याच्यातील गुणवत्तेचे दर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच झाले असले तरी त्याने प्रतिनिधीत्व केलेल्या नाशिक, महाराष्ट्र आणि मुंबईच्या खेळाडूंसाठी ही काही विशेष बाब नाही. २२ वर्षीय अभिषेकमधील आक्रमक खेळाचा अनुभवत्यांनी याआधीच घेतला आहे. मकरंद ओक यांच्या नाशिक क्रिकेट अकॅडमीची देण असलेल्या अभिषेकचे क्षेत्ररक्षणही लाजवाब. रायडर्सविरूध्दच्या सामन्यात जिगरबाज खेळ करणाऱ्या यशपालसिंगचा पॉइंटवर सुरेख झेल घेतल्यानेच रॉयल्सला आपले आव्हान कायम ठेवता आले. २००५-०६ मध्ये महाराष्ट्राकडून रणजी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या अभिषेकच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्राने १९ वर्षांआतील स्पर्धेचे विजेतेपद ६० वर्षांनंतर प्राप्त करण्यात यश मिळविले होते. या स्पर्धेतील सात सामन्यात ५४० धावा व १६ बळी अशी त्याची कामगिरी होती. श्रीलंकेत आयोजित १९ वर्षांआतील विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती.
सध्या मुंबईकडून खेळणाऱ्या अभिषेकने देवधर चषक स्पर्धेत प्रतिस्पध्र्याच्या माऱ्यासमोर संघ कोलमडला असताना बचाव व आक्रमण यांचा सुरेख संगम साधत सुंदर खेळी केली. कर्णधार वासीम जाफरनंतर त्याची ही ३४ धावांची खेळी सर्वोत्कृष्ट ठरली. २००३-०४ मध्ये विजय र्मचट चषक, बुचीबाबू चषक, सी. के. नायडू चषक अशा विविध स्पर्धामध्ये आपल्या खेळाची छाप पाडलेल्या अभिषेकचे यश नाशिकच्या नवोदित खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायक ठरणार ठरेल. षटकार राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मालिकावीर ठरलेला अभिषेक आयपीएलमधील यापुढील सामन्यांमध्येही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास अकॅडमीला आहे.