Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रेवा फिल्म क्लबचे उद्घाटन
नाशिक / प्रतिनिधी

 

येथे रेवा फिल्म क्लबचे उद्घाटन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ुटमधील निवृत्त प्राध्यापक राजा पोखरापूरकर यांच्या उपस्थितीत झाले. पोखरापूरकर हे कॅमेरा व पटकथा संवाद हा विषय इन्स्टिटय़ुटमध्ये गेली ३० वर्षे शिकवत होते. आंतरराष्ट्रीय विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या हस्ते रेवा फिल्म क्लबचे उद्घाटन झाले. यावेळी चित्रपट निर्मितीची प्रक्रिया त्यातील गुंतागुंत विविध सोप्या उदाहरणांव्दारे त्यांनी उलगडून सांगितली. फिल्म क्लबचे महत्व त्यांनी उपस्थित रसिकांना सांगितले व याव्दारे जगातील उत्तम उत्तम चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध होत आहे, याकडे लक्ष वेधले. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या दुसरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नाशिककरांना कशा प्रकारे फायदेशीर आहे व नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यास या महोत्सवाचा नक्कीच हातभार लागणार आहे, याचा आवर्जुन उल्लेख केला. क्लबच्या उद्घाटनानिमित्त पंख व लव इन गोवा हे दोन माहितीपट दाखविण्यात आले.
क्लबच्या उद्घाटनास व्यासपीठावर नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, दिग्दर्शक विवेक देशपांडे उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष मुकेश कणेरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रिया तुळजापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमास रेल्वे प्रवासी संघटनेचे नितीन गांधी, मराठी नाटय़ अभिनेत्री इला भाटे, तसेच अ‍ॅड. शरद कुटे, अनिल कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, आनंद भट्टड, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.